धुळे महापालिका निवडणूक: प्रभाग १८ मध्ये राडा, EVM ची तोडफोड, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 15:37 IST2026-01-15T15:37:08+5:302026-01-15T15:37:17+5:30
मिरच्या मारोती शाळेतील मतदान केंद्रावर दोन गटात जोरदार वाद झाला.

धुळे महापालिका निवडणूक: प्रभाग १८ मध्ये राडा, EVM ची तोडफोड, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
धुळे: धुळे महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना आज दुपारी प्रभाग १८ मध्ये खळबळजनक घटना घडली. मिरच्या मारोती शाळेतील मतदान केंद्रावर दोन गटात जोरदार वाद झाला, ज्याचे पर्यावसान हाणामारीत झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख व उमेदवार सतीष महाले आणि विरोधी गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये दुपारी १२:३० च्या सुमारास बाचाबाची झाली. या वादादरम्यान एका जमावाने थेट मतदान केंद्रात शिरून एका ईव्हीएम (EVM) मशिनची तोडफोड केली. घटनास्थळी एक हाताचे घड्याळही सापडले असून, सीसीटीव्ही फुटेज तपासून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी सतीष महाले यांनी केली आहे.
घटनेची माहिती मिळताच साक्रीच्या आमदार मंजुळा गावीत आणि अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांनी मतदान केंद्राला भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या राड्यानंतर परिसरात तणावपूर्ण शांतता असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तोडफोड झालेल्या मशिनच्या जागी दुसरी व्यवस्था केल्यानंतर सुमारे एक तासाने मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीत सुरू झाली.