निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपानं १ कोटी ऑफर दिली, पण...; शिंदेसेनेच्या नेत्याचा गंभीर आरोप
By प्रविण मरगळे | Updated: January 4, 2026 16:20 IST2026-01-04T16:18:39+5:302026-01-04T16:20:37+5:30
धुळे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १० मधून शिंदेसेनेचे महानगरप्रमुख संजय वाल्हे यांच्या पत्नी सविता वाल्हे या निवडणुकीला उभ्या आहेत.

निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपानं १ कोटी ऑफर दिली, पण...; शिंदेसेनेच्या नेत्याचा गंभीर आरोप
धुळे - राज्यातील २९ महापालिका निवडणुकीत पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात बिनविरोध पॅटर्न पाहायला मिळाला. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी प्रमुख पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने महायुतीचे उमेदवार बिनविरोध झाले आहेत. महायुतीचे ६५ हून अधिक उमेदवार बिनविरोध नगरसेवक बनले आहे. यावरून विरोधकांनी महायुतीवर दमदाटी, पैशाचे आमिष दाखवून महायुतीने ही खेळी खेळल्याचा आरोप केला. मात्र धुळे महापालिकेच्या निवडणुकीत शिंदेसेनेचे नेते संजय वाल्हे यांनी भाजपावर असेच गंभीर आरोप लावले आहेत. त्यातून विरोधकांच्या आरोपांना आणखी बळ मिळाले.
धुळे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १० मधून शिंदेसेनेचे महानगरप्रमुख संजय वाल्हे यांच्या पत्नी सविता वाल्हे या निवडणुकीला उभ्या आहेत. याठिकाणी वाल्हे यांच्या पत्नीने निवडणुकीतून माघार घ्यावी यासाठी भाजपाकडून १ कोटी देण्याची ऑफर आली परंतु ही ऑफर आपण नाकारल्याचा दावा वाल्हे यांनी केला आहे. याबाबत संजय वाल्हे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात संजय वाल्हे म्हणाले की, माझी पत्नी सविता वाल्हे हिने प्रभाग क्रमांक १० मधून उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्याच्या २ दिवस आधीपासून या धुळे शहरात भारतीय जनता पार्टीने अक्षरश: हैदोस घातला आहे. लोकशाहीपद्धतीने होणारी निवडणूक होऊच नये यासाठी उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी कोट्यवधीच्या ऑफर दिल्या जात होत्या असा आरोप त्यांनी केला.
तसेच अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी १.४५ च्या सुमारास २ लोक माझ्याकडे आले. माझ्या पत्नीच्या विरोधात जे भाजपाचे उमेदवार आहेत, त्यांना बिनविरोध करण्यासाठी आपण १ कोटी घ्यावेत. ही निवडणूक बिनविरोध करावी असं मला त्यांनी सांगितले. परंतु मी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही महाराष्ट्रात काम करतो. शिवसेना कधीही पैशांसाठी काम करत नाही. या प्रभाग क्रमांक १० मधील जनतेचा आशीर्वाद माझ्या पत्नीच्या मागे आहेत. त्यामुळे मी ती १ कोटींची ऑफर धुडकावली. तुम्ही १ कोटी काय ५ कोटी दिले तरीही निवडणुकीतून माघार घेणार नाही असा दावाही शिंदेसेनेचे महानगरप्रमुख संजय वाल्हे यांनी केला.
दरम्यान, याच धुळे महापालिकेतील आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर फिरतोय. त्यात संजय वाल्हे एका महिला उमेदवाराच्या हात जोडून पाया पडताना दिसत आहेत. त्यात महिलेला तुम्ही उमेदवारी माघारी घेऊ नका. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तुम्हाला पक्षाने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे तुम्ही माघारी घेऊ नका असं ते या महिलेला विनवणी करताना दिसत आहेत. त्यामुळे अर्ज माघारी घेण्यावरून धुळे शहरात प्रचंड गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे धुळे महापालिकेत महायुतीतील भाजपा आणि शिंदेसेना आमनेसामने लढत आहेत.