"तुमको मिर्ची लगी तो मै क्या करूं..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 16:31 IST2026-01-06T16:31:36+5:302026-01-06T16:31:59+5:30
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray, Dhule Municipal Election 2026: धुळ्यातील प्रचारसभेत मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंवर टीकेची तोफ डागली

"तुमको मिर्ची लगी तो मै क्या करूं..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray, Dhule Municipal Election 2026: राज्यात होत असलेल्या २९ महापालिकांच्या निवडणुकांमध्ये जवळपास ६८ उमेदवार बिनविरोध आल्याच्या मुद्द्यावरून राजकीय रणकंदन सुरू आहे. ज्या प्रभागांमध्ये उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, अशा ठिकाणच्या निवडणुका रद्द करून त्या प्रभागांमध्ये नव्याने निवडणूक प्रक्रिया राबवावी, अशी मागणी उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच निवडणूक आयोग भाजपाच्या सांगण्यानुसार काम करत असल्याचे आरोपही उद्धवसेनेकडून सातत्याने करण्यात येत आहेत. याच मुद्द्यावरून आज देवेंद्र फडणवीस यांनी धुळ्यात बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
"या वेळेला आपण सर्वांनी कमाल केलीत. सर्वत्र निवडणुकांचा माहोल आहे. कार्यकर्ते कामाला लागले आहेत. पण धुळ्यात सुरुवातीलाच चार नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. तुम्ही बिनविरोधचा चौकार लगावला आहे. धुळ्यामध्ये भाजपने चार नगरसेवक निवडून आणले आहेत. पण आपले नगरसेवक बिनविरोध निवडून आले, त्यामुळे काही लोकांना मात्र मिर्ची झोंबली आहे. अब तुमको मिर्ची लगी तो मै क्या करू..." अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला लगावला.
लोकसभेत काँग्रेसच्या काळात ३३ खासदार बिनविरोध
"देशाच्या लोकसभेमध्ये तब्बल ३५ खासदार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यापैकी ३३ खासदार हे काँग्रेसच्या काळात निवडून आले आहेत. खासदार जेव्हा बिनविरोध निवडून येतात तेव्हा लोकशाही जिवंत असते आणि धुळेकरांनी आमचे चार नगरसेवक बिनविरोध दिले, तर लोकशाहीचा खून झाला. असे म्हणणाऱ्यांचे डोकं नेमकं कुठे आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही. आमची जनता आमच्यावर प्रेम करते. आम्ही जनतेचे स्वीकारतो आणि सर्वांना धन्यवाद देतो. प्रत्येक शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा आमचा प्रयत्न असेल," असे आश्वासन फडणवीसांनी दिले.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
सध्याची सत्ता लोकशाही नसून झुंडशाही आहे. दमदाटी करून बिनविरोध निवडणुका लादल्या जात असून, निकाल राखून ठेवले जात आहेत. मतदारांना मतदानापासून वंचित ठेवले गेले. विशेषतः जेन-झी मतदारांचा हक्क हिरावला गेला आहे. जेथे बिनविरोध निवडणुका झाल्या, तेथे प्रक्रिया रद्द करून पुन्हा निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.