बंडखोरीच्या भीतीने पक्षांची गुपित रणनीती; भाजपत इच्छुकांची गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 12:31 IST2025-12-24T12:31:00+5:302025-12-24T12:31:16+5:30
जागा वाटपाचा तिढा सुटना, इच्छुकांकडून उमेदवारीसाठी प्रतीक्षा

बंडखोरीच्या भीतीने पक्षांची गुपित रणनीती; भाजपत इच्छुकांची गर्दी
धुळे : महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ३० डिसेंबर ही अंतिम मुदत असताना, सर्वच प्रमुख पक्षांनी अद्याप आपल्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. 'बंडखोरी' टाळण्यासाठी सर्वच पक्षांनी 'वेट अँड वॉच'ची भूमिका घेतली असून, ऐनवेळी पत्ते खोलण्याची रणनीती आखली जात आहे.
भाजपाच्या बैठकीत सर्वच जागांवर उमेदवार देऊन स्वतंत्र निवडणूक लढवावी, असा सुर पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधून निघाला होतो. त्यामुळे आता युतीकडे लक्ष लागून आहे.
शिंदेसेनेकडून २१ जागाचा होतोय दावा...
शिंदेसेनेकडून २१ जागांवर दावा केला जात आहे तर भाजप ५५ प्लसवर ठाम आहे. त्यामुळे आता याबाबत नेमकी कोणती भूमिका घेतात, यावर महायुतीचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
महायुतीबाबत बैठकीत तोंडगा निघालाच नाही
मालेगाव रोडवरील भाजपाच्या वॉर रुममध्ये युतीसंदर्भात सोमवारी भाजपाच्या वतीने पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार अनुप अग्रवाल, आमदार राम भदाणे, महानगराध्यक्ष गजेंद्र अपंळकर, आमदार मंजुळा गावित, जिल्हाप्रमुख डॉ. तुळशीराम गावित, मनोज मोरे, सतिष महाले यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. रात्री उशिरापर्यंत सुरु होती. यात सुमारे दोन ते अडीच तास युतीबद्दल ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे दोन्ही पक्ष स्वंतत्र लढण्याची शक्यता आहे.
'आयात' उमेदवारांमुळे निष्ठावंतांमध्ये अस्वस्थता
निवडणुकीच्या तोंडावर इतर पक्षांतून आलेल्या 'आयात' उमेदवारांना झुकते माप मिळण्याची चर्चा सुरू झाली आहे. यामुळे वर्षानुवर्षे पक्षाचे काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. 'पक्षासाठी सतरंज्या उचलणाऱ्यांना डावलून बाहेरून आलेल्यांना तिकीट दिले, तर गप्प बसणार नाही,' असा इशारा निष्ठावंतांनी दिला आहे. ही अस्वस्थता मोठ्या पक्षांच्या हक्काच्या 'व्होट बँक'ला सुरुंग लावू शकते.
भाजपत इच्छुकांची त्सुनामी; १ जागेसाठी ४५ जण रिंगणात
या निवडणुकीत भाजपकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. महापालिकेच्च्या ७४ जागांसाठी तब्बल ५५५ जणांनी मुलाखती दिल्या आहेत. काही प्रभागांमध्ये तर एका जागेसाठी ४५ ते ५५ जण रांगेत आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने इच्छुक असल्याने कोणाला संधी द्यायची आणि कोणाचा पत्ता कापायचा, असा पेच पक्षश्रेष्ठींसमोर आहे. ज्यांना उमेदवारी मिळणार नाही, ते बंडखोरी करण्याची दाट शक्यता असल्याने भाजपने आपली रणनीती कमालीची गुप्त ठेवली आहे
निवडणूकीत बंडखोरांवर विरोधकांचा 'डोळा'
भाजपमधील नाराजांना आपल्या गळाला लावण्यासाठी शिंदेसेना, अजित पवार गट, उद्धवसेना आणि काँग्रेस या पक्षांनी हालचाली सुरू केल्या आहेत. भाजपची उमेदवारी कापली जाणारे 'तुल्यबळ' उमेदवार आपल्याकडे ओढून त्यांना उमेदवारी देण्याची तयारी या पक्षांनी दर्शवली आहे. यामुळे उमेदवारी जाहीर होताच मोठ्या प्रमाणावर पक्षांतराची लाट येण्याची चिन्हे आहेत.
राष्ट्रवादी बैठकीत चर्चा, पण घोषणा अद्याप बाकी..
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अनिल पाटील यांनी स्थानिक पातळीवर युतीची शक्यता नसल्यास त्याबाबत वरिष्ठांना कळवण्यात येईल, असे सांगितले. मात्र अद्यापपर्यंत तरी जागा वाटपाबाबत निर्णय झालेला नाही.
अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणी याद्या जाहीर होणार?
बंडखोरांना अपक्ष अर्ज भरण्यास किंवा दुसऱ्या पक्षात जाण्यास पुरेसा वेळ मिळू नये, यासाठी सर्वच राजकीय पक्ष एक ते दोन दिवस आधीच अधिकृत नावे जाहीर करण्याची शक्यता आहे. तोपर्यंत केवळ 'संकेत' देऊन इच्छुकांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. त्यामुळे अंतिम टप्यात किती जण बंडखोरी करता, याकडे लक्ष लागून आहे.