उस्मानाबाद मतदारसंघासाठी ६३ टक्के मतदान, उन्हाच्या कडाक्याचा मतदानावर परिणाम

By चेतनकुमार धनुरे | Published: May 9, 2024 07:01 PM2024-05-09T19:01:46+5:302024-05-09T19:02:39+5:30

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी ३१ उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

63 percent polling for Osmanabad Constituency, Harsh summer affects polling | उस्मानाबाद मतदारसंघासाठी ६३ टक्के मतदान, उन्हाच्या कडाक्याचा मतदानावर परिणाम

उस्मानाबाद मतदारसंघासाठी ६३ टक्के मतदान, उन्हाच्या कडाक्याचा मतदानावर परिणाम

धाराशिव : उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी झालेल्या मतदान प्रक्रियेत रात्री उशिरा हाती आलेल्या माहितीनुसार ६३ टक्क्यांपर्यंत मतदान झाले होते. यात आणखी वाढ किंवा कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुपारच्या दोन सत्रांत उन्हाच्या कडाक्याचा मतदानावर परिणाम झालेला दिसून आला. सायंकाळी ५ वाजेपासून मात्र मतदार मोठ्या संख्येने बाहेर पडल्याने मतदान केंद्रांवर मोठी गर्दी झाली होती. यामुळे उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू ठेवावी लागली.

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी ३१ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. मंगळवारी दोन हजार १३९ मतदान केंद्रांवरून सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात करण्यात आली. पहिल्या टप्प्यातील ९ वाजेपर्यंत केवळ ५.७९ टक्के इतके मतदान झाले होते. वाढते ऊन पाहता मतदारांनी ९ वाजेनंतर मतदान केंद्र गाठायला सुरुवात केली. दुसऱ्या टप्प्यातील ९ ते ११ वाजेदरम्यान, जवळपास १२ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान हे तिसऱ्या सत्रातील ११ ते दुपारी १ या वेळेत झाले आहे. या कालावधीत १३ टक्के मतदान झाले. नंतर पुन्हा गती मंदावली. दुपारी १ ते ३ या वेळेत १० टक्के व त्यापुढील ३ ते सायंकाळी ५ या वेळेत १२ टक्के मतदानाची भर पडली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदारसंघात एकूण ५२.७८ टक्के इतके मतदान झाले होते. दरम्यान, रात्री उशिरा प्राप्त आलेल्या माहितीनुसार मतदान ६३ टक्क्यांपर्यंत गेले होते. यात आणखी वाढ किंवा कमी होण्याची शक्यता आहे.

आठ गावांचा बहिष्कार मागे
स्थानिक मुद्द्यांवरून धाराशिव जिल्ह्यातील ८ गावे, तांडे, वस्त्यांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. सोमवारपर्यंत यातील ६ गावांनी आपला बहिष्कार मागे घेतला. मात्र, दोन गावे ठाम राहिली. दरम्यान, मंगळवारी सकाळी मतदान सुरू झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर त्यांनीही बहिष्कार मागे घेतला.

यंत्रात कोठे बिघाड, तर कोठे क्रम चुकला
धाराशिव जिल्ह्यात मतदान सुरू झाल्यानंतर काही ठिकाणी मतयंत्रात बिघाड झाल्याचे समोर आले. धाराशिव शहरातील भीमनगर भागातील मतदान केंद्रावरील बिघाड लक्षात आल्यानंतर अर्धा तास मतदानाची प्रक्रिया ठप्प होती. तर वाशी शहरातील पाच मतदान केंद्रांवर पहिल्या बॅलेट युनिटच्या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचे बॅलेट युनिट ठेवल्याचे निदर्शनास आले. ही बाब लक्षात आल्यानंतर हा क्रम सुधारून घेण्यात आला.

Web Title: 63 percent polling for Osmanabad Constituency, Harsh summer affects polling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.