भाजप-कोणार्क विकास आघाडीमध्ये राडा; ४४ जण अटकेत; भिवंडीतील घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण शांतता
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 07:00 IST2026-01-20T06:59:43+5:302026-01-20T07:00:58+5:30
आरोपींना सोमवारी सायंकाळी भिवंडी न्यायालयात हजर करण्यात आले.

भाजप-कोणार्क विकास आघाडीमध्ये राडा; ४४ जण अटकेत; भिवंडीतील घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण शांतता
लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: शहरात भाजप व कोणार्क विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये रविवारी रात्री झालेल्या राड्याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटातील ४४ जणांना अटक केली आहे. यात विलास पाटील गटातील ३५ जणांना तर आ. महेश चौघुले गटातील ८ जणांचा समावेश आहे. आरोपींना सोमवारी सायंकाळी भिवंडी न्यायालयात हजर करण्यात आले.
राड्याप्रकरणी चौघुले गटाचे भावेश पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून माजी महापौर विलास पाटील यांसह १०० ते १५० जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर विलास पाटील गटाचे हर्ष वरळीकर यांच्या तक्रारीवरून चैतन्य पुल्लेवार व इतर १५ ते २० जणांविरोधात निवडणूक जिंकल्याचा राग मनात ठेऊन पाटील यांच्या रत्नदीप बंगला येथे हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.
तिसरा गुन्हा हा राजू तडका यांच्या फिर्यादीवरून भाजप उमेदवार रितेश टावरे व त्यांचे १०० ते १५० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर चौथा गुन्हा निजामपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वास डगळे यांनी विलास पाटील व त्यांचे १०० ते १५० तसेच भाजप उमेदवार टावरे व त्यांच्या ३० ते ४० जणांवर गुन्हा नोंदवला आहे.
दरम्यान, ॲड. मयुरेश पाटील हे सदस्य असलेल्या भिवंडी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. किरण चन्ने यांच्या नेतृत्वाखाली वकिलांनी सोमवारी दुपारी पाटील यांच्या निवासस्थानी भेट देत हल्ला करणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध केला. निजामपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वास डगळे यांना तत्काळ निलंबित करावे, अशी मागणी चन्ने यांनी केली.
‘फॉरेन्सिक’चे पथक पुरावे गोळा करण्यासाठी दाखल
सोमवारी आ. चौघुले यांच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात फॉरेन्सिक लॅब पथक दाखल होत घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यात आले. परिसरात तणावाचे वातावरण असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली होती.
खबरदारी म्हणून भिवंडीत पोलिसांचा रूट मार्च
भाजप व कोणार्क गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये रविवाच्या राड्यानंतर परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. खबरदारी म्हणून भिवंडी पोलिसांकडून सोमवारी रात्री कोंबडपाडा ते छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात रूट मार्च काढण्यात आला. यावेळी भिवंडी पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्यासह मोठ्या प्रमाणात पोलिस सहभागी झाले होते.