बदला घेण्यासाठी बिहारी व्यक्तीनं रचला कांड; ऐन गणेशोत्सवात मुंबईत पसरवली दहशत, पोलिसांची झोप उडवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 13:57 IST2025-09-06T13:56:18+5:302025-09-06T13:57:25+5:30

मुंबई पोलिसांनी या आरोपीकडून ७ मोबाईल फोन, ३ सिम कार्ड, एक एक्सटर्नल स्लॉट, ६ मेमरी कार्ड, २ डिजिटल कार्ड, ४ सिम कार्ड होल्डर जप्त केले आहेत.

A man named Ashwini was arrested from Noida for sending a threatening message to Mumbai Traffic Police’s | बदला घेण्यासाठी बिहारी व्यक्तीनं रचला कांड; ऐन गणेशोत्सवात मुंबईत पसरवली दहशत, पोलिसांची झोप उडवली

बदला घेण्यासाठी बिहारी व्यक्तीनं रचला कांड; ऐन गणेशोत्सवात मुंबईत पसरवली दहशत, पोलिसांची झोप उडवली

मुंबई - शहरात गणेशोत्सवाची धूम सुरू असताना मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर धमकीचा एक मेसेज आला होता. या प्रकरणी पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. उत्तर प्रदेशातील नोएडा येथून ५१ वर्षीय अश्विनी कुमार याला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. ज्याने स्वत:ला दहशतवादी संघटनेचा सदस्य असल्याचे सांगत मुंबईला हादरवणारी धमकी दिली होती. हा आरोपी मूळचा बिहारच्या पटना येथील राहणारा आहे. मागील ५ वर्षापासून तो नोएडा येथे राहत होता. व्यवसायाने तो ज्योतिषी असल्याचे पुढे आले आहे.

मुंबई पोलिसांनी या आरोपीकडून ७ मोबाईल फोन, ३ सिम कार्ड, एक एक्सटर्नल स्लॉट, ६ मेमरी कार्ड, २ डिजिटल कार्ड, ४ सिम कार्ड होल्डर जप्त केले आहेत. या आरोपीला मुंबईत आणण्यात आले. गुरुवारी रात्री उशिरा वाहतूक पोलिसांच्या नंबरवर धमकीचा मेसेज आला होता. त्यात ३४ मानवी बॉम्ब मुंबईत लावण्यात आले असून १४ पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसल्याचा दावा करण्यात आला. या मेसेजमध्ये लिहिलं होते की, ४०० किलो आरडीएक्सचा यासाठी वापर होणार आहे. ऐन गणेशोत्सवात सार्वजनिक गणपती विसर्जनापूर्वी हा मेसेज आल्याने मुंबई पोलिसांची झोप उडाली होती. पोलिसांनी शहरात अलर्ट जारी करत ठिकठिकाणी चोख बंदोबस्त लावला होता. विसर्जनाला मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर, समुद्रकिनारी असतात. त्यामुळे गर्दीचा फायदा घेऊन काही घातपात करण्याचा कट कुणी रचतंय का अशी भीती सगळ्यांना होती. 

तपासात काय आले समोर?

पोलिसांनी तपासात अश्विनी कुमारची चौकशी केली असता त्याने त्याचा मित्र फिरोजच्या नावाने हा मेसेज पाठवल्याचे समोर आले. या दोघांमध्ये पैशाच्या व्यवहारावरून भांडण होते. फिरोजने पटनाच्या फुलवारी शरीफ पोलीस ठाण्यात अश्विनीकुमारविरोधात तक्रार दिली होती. ज्यामुळे अश्विनीकुमारला ३ महिने जेलमध्ये राहावे लागले. याचाच बदला घेण्यासाठी अश्विनी कुमारने फिरोजचे नाव वापरून हा धमकीचा मेसेज मुंबई वाहतूक पोलिसांच्या नंबरवर पाठवला. मात्र तपासात पोलिसांनी अश्विनी कुमारला अटक केली. सुरुवातीच्या तपासात अश्विनी कुमारने दहशत पसरवण्यासाठी नव्हे तर मित्राचा बदला घेण्यासाठी आणि त्याला अडकवण्यासाठी हा मेसेज पाठवल्याचे कळले आहे.

काय होता मेसेज?

'लष्कर-ए-जिहादी' या दहशतवादी संघटनेचे १४ दहशतवादी मुंबईत घुसले असून ते ३४ गाड्यांमध्ये तब्बल ४०० किलो आरडीएक्स वापरून मोठा स्फोट घडवणार आहेत. या स्फोटात एक कोटी लोकांचा बळी जाण्याची शक्यता असल्याचे त्याने या संदेशात म्हटले होते. या संदेशामुळे सुरक्षा यंत्रणांमध्ये एकच खळबळ उडाली होती.

Web Title: A man named Ashwini was arrested from Noida for sending a threatening message to Mumbai Traffic Police’s

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.