आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशाच्या धक्क्यातून अजूनही पाकिस्तानी चाहते सावरलेले नाही. त्यात श्रीलंकेविरुद्धच्या वन डे मालिकेत 2-0 असा विजय मिळवल्यानंतर ट्वेंटी मालिकेत पाकला 0-3 असा दारूण पराभव पत्करावा लागला. त्यावरून पुन्हा एकदा पाकिस्तान संघावर चाहते चिडले आहेत आणि तो राग एका पत्रकार परिषदेत निघालेला पाहायला मिळाला. पाकिस्तानी ट्वेंटी-20 चषक स्पर्धेच्या घोषणेच्यावेळी एका पत्रकारानं चार चौघांत पाकचा कर्णधार सर्फराज अहमदचे वाभाडे काढले.
माजी कर्णधार मिसबाह-उल-हकची मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर सर्फराजचे कर्णधारपद जाईल अशी शक्यता होती. मात्र, मिसबाहनं त्याला कायम ठेवले आणि त्याच्याच नेतृत्वाखाली पाक संघाला ट्वेंटी-20 मालिकेत दारूण पराभव पत्करावा लागला. अनुभवी आणि वरिष्ठ खेळाडू म्हणून सर्फराजकडून मोठी खेळीची अपेक्षा होती. त्यातही तो अपयशी ठरला. या मालिकेनंतर पाकिस्तानात राष्ट्रीय ट्वेंटी-20 चषक स्पर्धेची सुरुवात झाली आणि त्यात सिंध संघाचे प्रतिनिधित्व सर्फराजकडे आहे. या स्पर्धेपूर्वीच्या पत्रकार परिषदेत पत्रकारानं सर्फराजचा अपमान केला. तो म्हणाला,''तू क्रिकेट चाहत्यांना निराश केले आहेस. त्यामुळे तुझा खेळ पाहण्यासाठी फैसलाबादला कोण येणार?'' 
इभ्रतीचे जाहीर वाभाडे निघाल्यानंतर सर्फराजनं सिंध संघाचे नेतृत्व करण्यास नकार दिला. 
पाकिस्तानचे क्रिकेटपटू आळशी; ट्रेनिंगला न जाता काढतात झोपा
पाकिस्तानचा संघ भारताशी तुलना करू पाहत असतो, पण या दोन्ही संघांमध्ये व्यावसायिकदृष्ट्या बराच मोठा फरक असल्याचे दिसत आहे. एकिकडे भारताने फिटनेस आणि ट्रेनिंगवर नेहमीच लक्ष दिले आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानचे क्रिकेटपटू ट्रेनिंगला जात नसून झोपा काढत असल्याचे पुढे आले आहे.
एका सूत्राने सांगितले की, " मिसबाह यांना संघाचा स्तर वाढवायचा आहे. त्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. पण संघातील वरिष्ठ खेळाडू त्यांचे काहीच ऐकत नसल्याचे समोर येत आहे. मिसबाह जेव्हा खेळाडूंना ट्रेनिंगसाठी बोलवतात तेव्हा ते काही तरी बहाणा बनवून झोपा काढतात. हीच गोष्ट मिसबाह यांना खटकत आहे."