WATCH: Shikhar Dhawan enacts Akshay Kumar's Bala character from Housefull 4, gets trolled by Bhuvneshwar Kumar | Video : शिखर धवननं केली 'बाला'ची नक्कल; भुवनेश्वर कुमारकडून ट्रोल
Video : शिखर धवननं केली 'बाला'ची नक्कल; भुवनेश्वर कुमारकडून ट्रोल

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील ट्वेंटी-20 मालिकेतील तिसरा व अंतिम सामना रविवारी नागपूर येथे खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने दुसरा सामना जिंकून मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिका विजयाचा टीम इंडियाचा निर्धार आहे. त्याचवेळी बांगलादेशनेही ऐतिहासिक मालिका जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे दोन्ही संघ नागपूर सामन्यात संपूर्ण ताकदीनं उतरतील हे निश्चित. या सामन्यासाठी भारतीय संघ राजकोटवरून नागपूरसाठी रवाना झाला आहे. त्या प्रवासात खेळाडूंनी मज्जामस्ती केली. त्यात शिखर धवनमधील कलाकार पाहायला मिळाला. 


अक्षय कुमारचा Housefull 4 हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. त्यातील अक्षयचा 'बाला' हे कॅरेक्टर नेटिझन्सच्या पसंतीत पडलेले आहे. भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन यानं तर चक्क बालाची नक्कल केली आहे. खलिल अहमद आणि युजवेंद्र चहल यांच्यासोबतच्या एका व्हिडीओत धवन बालाची नक्कल करताना दिसत आहे. 
 

धवनच्या या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव झाला. अफगाणिस्तान संघाचा कर्णधार रशिद खानसह अनेकांनी प्रतिक्रियाही दिली. त्यातील भूवनेश्वर कुमारची प्रतिक्रिया चर्चेची ठरली. भुवीनं लिहिले की,''विसण्याची नक्कल कशाला करतोस, ते तर तुझं नॅच्यरल टॅलेंट आहे.'' 
टीम इंडियाचे मजबूत व कमकुवत बाजू
रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल ही तगडी आघाडीची फळी भारताकडे आहे. रोहित आणि धवन यांनी आपापली भूमिका चोख बजावली आहे. राहुलला साजेशी कामगिरी करता आली नाही. श्रेयस अय्यर यानं साजेशी कामगिरी केली आहे. रिषभ पंत याचे अपयश हे टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरू शकते. त्याने यष्टिमागेही निराश केले आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात त्याला बसवले जावे, अशी मागणी होत आहे. पंतला पर्याय म्हणून संघात संजू सॅमसन हा पर्याय आहे. शिवाय मनीष पांडेला संधी देऊन राहुलला यष्टिमागे जबाबदारी सांभाळण्यास देता येईल. 

गोलंदाजी हा भारतासाठी चिंतेची बाब आहे. प्रमुख गोलंदाजांच्या अनुपस्थितीत युवा खेळाडूंना संधी मिळालीय, परंतु त्यांना त्यावर खरे उतरता आलेले नाही. युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी फिरकीची जबाबदारी सक्षमपणे पेलली आहे. पण, जलद माऱ्यात टीम इंडियाला मार खावा लागला आहे. दीपक चहरच सातत्यपूर्ण खेळ करताना पाहायला मिळत आहे. त्याला खलिल अहमदकडून साजेशी साथ मिळालेली नाही. नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या शिवम दुबेकडे तितकासा अनुभव नाही. त्यामुळे खलिल आणि शिवम यांच्या जागी अनुक्रमे शार्दूल ठाकूर व मनीष पांडे यांना संधी मिळू शकते. पण, रोहित आहे तोच संघ तिसऱ्या सामन्यातही कायम ठेवण्याची शक्यता अधिक आहे. 
 

Web Title: WATCH: Shikhar Dhawan enacts Akshay Kumar's Bala character from Housefull 4, gets trolled by Bhuvneshwar Kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.