Virat Kohli Vishal Jaiswal Vijay Hazare Trophy: सध्या विराट कोहली आणि इतर बडे स्टार्स २०२५-२६च्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळत आहेत. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली हा सध्या सक्रीय असलेल्या सर्व फलंदाजांमध्ये सर्वोत्तम यादीतील एक आहे. त्याची विकेट घेणे हा एखाद्या गोलंदाजासाठी बहुमानच समजला जातो. गुजरातचा डावखुरा फिरकी गोलंदाज विशाल जयस्वालने विराट कोहलीची विकेट घेतली. विराटने अर्धशतक ओलांडले होते आणि तो शतकाच्या दिशेने वाटचाल करत होता. पण त्याला विशालने आपल्या फिरकीने गुंडाळले. पण महत्त्वाची बाब म्हणजे, विराटने आपलीच विकेट घेणाऱ्या विशाल खास गिफ्ट दिले.
कोहली ७७ धावांवर बाद
दिल्लीकडून स्पर्धेतील त्याच्या दुसऱ्या सामन्यात खेळताना विराट कोहली उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत होता. त्याने ६१ चेंडूत शानदार ७७ धावा केल्या. तो त्याचे सलग दुसरे शतक झळकावण्यास सज्ज दिसत होता, परंतु विशाल जयस्वालच्या एका सुंदर चेंडूने त्याला बाद केले. कोहली डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाला पुढे येऊ फटका खेळण्याच्या उद्देशाने क्रीजबाहेर पडला, तेव्हा चेंडू वळला आणि विकेटकीपरने कोहलीले यष्टीचीत केले. ही विकेट घेतल्यानंतर विशाल जयस्वाल खूप आनंदी झाला.
कोहलीने दिलं खास गिफ्ट
विराटची विकेट मिळाल्याने गोलंदाज विशाल खूप आनंदी झाला. त्याला यानंतर आणखी एक खास गिफ्ट मिळाले. त्याने ज्या चेंडूने विराटची विकेट काढली, त्या चेंडूवर विराट कोहलीकडून त्याला सही मिळाली. त्याने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर स्टार फलंदाजासोबतचा फोटो शेअर केला आहे. जयस्वालने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, जगभरात क्रिकेटवर राज्य करताना त्याला पाहणे आणि नंतर त्याच मैदानावर त्याच्यासोबत खेळताना त्याची विकेट घेणे. हा क्षण मी कधी कल्पनाही केली नव्हती. विराट भाईची विकेट घेणे माझ्यासाठी नेहमीच संस्मरणीय राहील. या संधीबद्दल, या प्रवासाबद्दल आणि या सुंदर खेळाने मला दिलेल्या सर्व गोष्टींबद्दल मी आभारी आहे."
दरम्यान, विशाल जयस्वालने विराट कोहलीला तर बाद केलेच. त्याचसोबत त्याने ऋषभ पंतलाही क्लीन बोल्ड केले. तसेच अर्पित राणा आणि नितीश राणा यांनाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याने त्याच्या १० षटकांमध्ये ४२ धावांत ४ बळी टिपले.