Vaibhav Suryavanshi: भारताचा युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी (वय 14) सातत्याने आपल्या कामगिरीतून क्रिकेटविश्वात नवे विक्रम प्रस्थापित करत आहे. आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात शतक झळकावण्याचा मान मिळवल्यानंतर, नुकत्याच झालेल्या विजय हजारे ट्रॉफीतील पहिल्याच सामन्यात 190 धावांची विक्रमी खेळी करत त्याने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले. क्रिकेटमधील याच उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत आता भारत सरकारकडून वैभवला अत्यंत मानाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ प्रदान
क्रिकेटमधील उत्कृष्ट आणि प्रेरणादायी कामगिरीसाठी वैभव सूर्यवंशीला देशातील सर्वोच्च बाल सन्मान ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ देण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुरस्कार समारंभामुळे सामन्याला मुकला
आज, 26 डिसेंबर रोजी विजय हजारे ट्रॉफीमध्ये बिहार संघ आपला दुसरा सामना खेळत असताना, पुरस्कार समारंभामुळे वैभवला सामन्याला मुकावे लागले. विशेष म्हणजे, फक्त वैभवच नाही, तर या कार्यक्रमात शौर्य, क्रीडा, संगीत, विज्ञान आदी क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या देशभरातील गुणवंत मुलांना सन्मानित करण्यात आले.
कुटुंबीय आनंदी...
हा पुरस्कार वैभवसाठीच नव्हे, तर त्याच्या संपूर्ण कुटुंबासाठी अभिमानाचा क्षण ठरला. वैभवचा मोठा भाऊ उज्ज्वल सूर्यवंशी याने सोशल मीडियावर वैभवचा पुरस्कार स्वीकारतानाचा फोटो शेअर करत भावना व्यक्त केल्या. त्याने लिहिले, देशाच्या राष्ट्रपतींच्या हस्ते वैभवला बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे.