Vaibhav Suryavanshi vs Arjun Tendulkar: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये बिहार विरूद्ध गोवा सामन्यात वैभव सूर्यवंशी आणि अर्जुन तेंडुलकर यांच्यातील लढतीवर सर्वांचे लक्ष होते. हे दोघे आमनेसामने आल्यावर कोण कुणावर वरचढ ठरेल, असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला होता. याचे उत्तर समोर आले. वैभव सूर्यवंशी आणि अर्जुन तेंडुलकर यांच्यातील थेट लढतीत चांगलीच रंगत पाहायला मिळाली.
वैभव सूर्यवंशी विरुद्ध अर्जुन तेंडुलकर
गोव्याने वैभव सूर्यवंशीविरुद्ध चार गोलंदाजांचा वापर केला. त्यामध्ये अर्जुन तेंडुलकरदेखील होता. धुलाई झालेल्या गोलंदाजांमध्ये अर्जुन तेंडुलकरचा दुसरा क्रमांक लागला. सूर्यवंशीने त्याच्या डावात अर्जुन तेंडुलकरच्या १० चेंडूंचा सामना केला आणि १५० च्या स्ट्राईक रेटने १५ धावा केल्या. सूर्यवंशीने अर्जुन तेंडुलकरविरुद्ध तीन चौकार, एक दुहेरी आणि एक एकेरी धावा घेतली. अर्जुन तेंडुलकरपेक्षा जास्त स्ट्राईक रेटने त्याने गोव्याचा गोलंदाज दीपराज गावकरच्या गोलंदाजीवर फटकेबाजी केली. वैभवने दीपराजच्या पाच चेंडूंवर ३०० पेक्षा जास्तीच्या स्ट्राईक रेटने १६ धावा केल्या, ज्यात दोन षटकार आणि एक चौकार होता. पण शेवटी दीपराज गावकरनेच वैभव सूर्यवंशीची विकेट घेतली.
४ षटकार व ४ चौकार, वैभवची ४६ धावांची खेळी
वैभव सूर्यवंशीचा गोवा विरुद्धचा डाव २५ चेंडूंचा होता. त्यामध्ये त्याने १८४ च्या स्ट्राईक रेटने ४ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने ४६ धावा केल्या. यासह, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२५ मध्ये वैभव सूर्यवंशीच्या एकूण धावा १८६ झाल्या आहेत. त्यात १४ षटकारांचा समावेश आहे. वैभव सूर्यवंशीच्या जलद खेळीमुळे बिहारने गोव्याविरुद्ध पॉवरप्लेमध्ये ५९ धावा केल्या. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात त्याची विकेट पडली. त्यामुळे त्याला मोठी खेळी करता आली नाही.