That's why Rohit Sharma is the captain of Mumbai Indians, Say Sachin Tendulkar | रोहित शर्माकडे मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद का सोपवलं? सचिन तेंडुलकरनं सांगितलं कारण

रोहित शर्माकडे मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद का सोपवलं? सचिन तेंडुलकरनं सांगितलं कारण

मुंबई : भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा सध्या भलत्याच फॉर्मात आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत रोहितनं पाच शतकं झळकावली असून 647 धावांसह तो अव्वल स्थानावरही आहे. भारताकडून एकाच वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्याची संधी रोहितला आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात त्याच्याकडून आणखी एका मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. तत्पूर्वी, तेंडुलकरनं रोहित शर्मालामुंबई इंडियन्सचे कर्णधारपद देण्याबाबत एक मोठा खुलासा केला.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामन्यात पावसाने खोडा घातल्यानं तो राखीव दिवशी खेळवण्यात येणार आहे. मंगळवारचा संपूर्ण दिवस पावसामुळे वाया गेल्यानंतर भारताच्या अनेक माजी खेळाडूंचे चर्चासत्र रंगले होते. त्यात रोहितच्या नावाची चर्चा झाली आणि त्याचवेळी रोहितकडे मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद का सोपवलं याचा खुलासाही झाला. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सनं चार वेळा आयपीएल जेतेपदं पटकावली. कर्णधार म्हणून सर्वाधिक चार जेतेपद जिंकणारा रोहित हा एकमेव खेळाडू आहे.

तेंडुलकर म्हणाला,''2013मध्ये मी इंडियन प्रीमिअर लीगमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर कर्णधारपदाची जबाबदारी कोणाकडे सोपवावी, हा सर्वांनाच प्रश्न पडला होता. मुंबई इंडियन्सचे नेतृत्व अशा व्यक्तीच्या हाती सोपवायचे होते की तो संघासोबत दीर्घकाळ राहील. दर दोन वर्षांनी कर्णधारपदाचा उमेदवार शोधण्याची वेळ येण्यापासून आम्हाला टाळायची होती. त्यात रोहित हा सक्षम पर्याय आमच्यासमोर होता. त्याचे नेतृत्वगुण आपण पाहतोच आहोत. रोहितनेही त्याची निवड सार्थ ठरवली.'' 

कर्णधारपद मिळाल्यानंतर रोहित अधिक जबाबदार खेळाडू झाला. त्यापूर्वी तो फार कूल आणि मज्जामस्करी करायचा, असेही तेंडुलकरने सांगितले. 

कौन है वो?... 'या' व्यक्तीसाठी रोहित शर्माला जिंकायचाय वर्ल्ड कप!
भारताच्या या सलामीवीराला माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीसाठी हा वर्ल्ड कप जिंकायचा आहे. या वर्ल्ड कप स्पर्धेनंतर धोनी निवृत्ती स्वीकारेल, अशी चर्चा आहे. त्यामुळे 37 वर्षीय धोनीला अखेरच्या वर्ल्ड कप स्पर्धेत विजयी भेट देण्याचा संघातील सर्वच सदस्यांचा प्रयत्न असेल. रोहितचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी सांगितले की,''रोहितचा खेळ अधिक परिपक्व झालेला पाहायला मिळत आहे. 10-12 षटकं त्याने खेळून काढल्यास, तो सहज शतक झळकावून जातो. तो संघाचा उपकर्णधार आहे आणि त्यामुळे खेळपट्टीवर अधिक काळ राहणे किती महत्त्वाचे आहे, याची त्याला जाण आहे.''

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: That's why Rohit Sharma is the captain of Mumbai Indians, Say Sachin Tendulkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.