Team ready for T-20 series; Sorting doesn't matter | टी२० सामन्यांच्या मालिकेसाठी संघ सज्ज; क्रमवारी महत्त्वाची नाही ठरणार
टी२० सामन्यांच्या मालिकेसाठी संघ सज्ज; क्रमवारी महत्त्वाची नाही ठरणार

- अयाझ मेमन (कन्सल्टिंग एडिटर लोकमत)

शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या टी२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारत आणि वेस्ट इंडिज संघ सज्ज झाले आहेत. यानंतर एकदिवसीय सामन्यांची मालिकाही रंगेल. मात्र आगामी टी२० विश्वचषक स्पर्धेची तयारी म्हणून भारत-वेस्ट इंडिजसाठी टी२० मालिका खूप महत्त्वाची ठरणार आहे. महत्त्वाचे म्हणजे २०१६ साली टी२० विश्वचषक भारतात झाली होती आणि त्या वेळी वेस्ट इंडिजनेच उपांत्य फेरीत भारताला नमवले होते. त्यानंतर इडन गार्डन्स येथे झालेल्या अंतिम सामन्यात इंग्लंडला धक्का देत विंडीजने विश्वविजेतेपदही पटकावले होते. टी२० क्रमवारीत विंडीज संघ दहाव्या, तर भारत पाचव्या स्थानी आहे. मात्र मैदानात क्रमवारीतील हा फरक अजिबात दिसून येणार नाही.
विंडीज संघाच्या दृष्टीने सांगायचे झाल्यास किएरॉन पोलार्डला कर्णधार बनवून विंडीज क्रिकेटने टी२० मध्ये मोठे पाऊल टाकले आहे. ही मालिका भारतात होत असल्याने पोलार्ड अत्यंत महत्त्वाचा खेळाडू ठरेल. तो सलग दहा वर्षे मुंबई इंडियन्सकडून खेळत असल्याने त्याच्याकडे भारतातील प्रदीर्घ अनुभव आहे. भारतातील प्रत्येक मैदानाची, खेळपट्टीची शिवाय खेळाडूंची त्याला माहिती आहे. त्याचप्रमाणे, पोलार्डकडे युवा आणि अनुभवी खेळाडूंचे मिश्रण असलेला संघ आहे. त्यामुळे त्याच्याकडे भारताला धक्का देण्याची क्षमता नक्कीच आहे.
मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा यांचे टी२० क्रिकेटमध्ये पुनरागमन झाले आहे. तसेच, कुलदीप यादव-युझवेंद्र चहल पुन्हा एकत्रित खेळतील. मात्र फलंदाजांवर अधिक जबाबदारी असेल. शिखर धवनच्या अनुपस्थितीत संजू सॅमसनला संधी मिळेल. मात्र सर्वाधिक लक्ष लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर यांच्यावर असेल. तसेच कर्णधार विराट कोहलीचे पुनरागमन होत आहे. एकूणच फलंदाजीत भारत अत्यंत मजबूत असल्याचे दिसत आहे. याशिवाय दोन अन्य खेळाडूंवर सर्वांची विशेष नजर असेल आणि ते खेळाडू म्हणजे शिवम् दुबे व रिषभ पंत. दुबे अष्टपैलू असून आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो. हार्दिक पांड्याच्या जागी त्याला निवडले असल्याने त्याच्यावर नक्कीच सर्वांचे लक्ष असणार. दुसरा खेळाडू म्हणजे पंत. अनेक टीकांना सामोरा गेल्यानंतर तो दडपणाखाली असेल. संघ व्यवस्थापनाने विश्वास दाखविला असल्याने त्याचा आत्मविश्वासही उंचावला असेल.

Web Title: Team ready for T-20 series; Sorting doesn't matter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.