South Africa Squad Announcement T20World Cup 2026: भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली होणाऱ्या आगामी ICC टी२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी विविध क्रिकेट बोर्ड आपापले संघ जाहीर करत आहेत. ७ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत स्पर्धेचे सामने खेळवण्यात येणार आहेत. गतविजेता टीम इंडियाने आधीच संघ जाहीर केला आहे. त्यानंतर आज उपविजेता दक्षिण आफ्रिकेनेही आपला टी२० संघ जाहीर केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, आफ्रिकेने या स्पर्धेसाठी तीन बड्या खेळाडूंना संघाबाहेरचा रस्ता दाखवला आहे.
अनुभवी फलंदाज एडन मार्कराम या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व करणार आहे. संघात मोठे बदल करत दक्षिण आफ्रिकेच्या निवडकर्त्यांनी काही धक्कादायक निर्णय घेतले आहेत. संघातील स्फोटक फलंदाज ट्रिस्टन स्टब्स आणि सलामीवीर रायन रिकल्टन यांना संघात स्थान मिळालेले नाही. स्टब्सची खराब फॉर्ममुळे गच्छंती झाल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे, अनुभवी यष्टिरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉक याने आपली निवृत्ती मागे घेतल्याने त्याला संघात स्थान मिळाले आहे, त्यामुळे रायन रिकल्टन संघाबाहेर झाला आहे. तसेच रीझा हेंड्रिक्सलाही संघातून वगळले आहे.
तरुण खेळाडूंना संधी
निवड समितीने यावेळेस अनेक युवा खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे. यामध्ये वेगवान गोलंदाज क्वेना मफाका, जेसन स्मिथ, डोनोवन फरेरा, कॉर्बिन बॉश आणि डेवाल्ड ब्रेव्हिस यांसारख्या खेळाडूंना प्रथमच टी२० वर्ल्डकपचे तिकीट मिळाले आहे. गोलंदाजीची धुरा अनुभवी कगिसो रबाडा, ऑनरिक नॉर्खिया आणि लुंगी एनगिडी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. फिरकी गोलंदाजीची जबाबदारी केशव महाराज आणि जॉर्ज लिंडे यांच्यावर असेल.
दक्षिण आफ्रिकेचा १५ सदस्यीय संघ: एडन मार्कराम (कर्णधार), क्विंटन डी कॉक, टोनी डी झॉर्झी, डेवाल्ड ब्रेव्हिस, डेव्हिड मिलर, डोनोवन फरेरा, मार्को जान्सेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, क्वेना मफाका, लुंगी एनगिडी, जेसन स्मिथ, जॉर्ज लिंडे, कॉर्बिन बॉश, एनरिक नॉर्खिया