Sourav Ganguly may be subjected to conflict of interest inquiry after being chosen as new BCCI president | सौरव गांगुलीचं BCCI अध्यक्षपद येऊ शकतं धोक्यात? हे आहे कारण!
सौरव गांगुलीचं BCCI अध्यक्षपद येऊ शकतं धोक्यात? हे आहे कारण!

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय) अध्यक्षपदावर सौरव गांगुलीच्या निमित्तानं 65 वर्षांनंतर भारताचा माजी कर्णधार विराजमान होणार आहे. अध्यक्षपदासाठीचा अर्ज भरण्याची वेळ सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे आणि गांगुली मुंबईतील मुख्यालयात दाखल झाला आहे. गांगुलीच्या विरोधात कोणी अर्ज न केल्यानं त्याची निवड निश्चित मानली जात आहे. मात्र, त्याची ही निवड कायद्याच्या कचाट्यात येऊ शकते. हितसंबंध जपण्याचा मुद्दा उपस्थित करताना मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेचे सदस्य संजीव गुप्ता पुन्हा एकदा प्रशासकिय समितीकडे दाद मागू शकतात. तसे झाल्यास गांगुलीचे अध्यक्षपद धोक्यात येऊ शकते.

गांगुली सध्या बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष आहे. हितसंबंध जपण्याच्या मुद्यावरून गुप्ता यांनी प्रशासकिय समितीला 400 पेक्षा अधिक पत्र पाठवले आहेत. त्यात त्यांनी सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण, राहुल द्रविड, गांगुली यांच्या नावाचाही उल्लेख केला आहे. त्यामुळेच तेंडुलकर, लक्ष्मण आणि गांगुली यांनी सल्लागार समितीच्या सदस्याचा राजीनामा दिला होता. तर द्रविडकडे बीसीसीआयच्या लोकपालांनी स्पष्टीकरण मागितले होते.

आता गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यास त्याच्या मागेही हा ससेमिरा लागू शकतो. त्यामुळे अध्यक्षपदासाठी अर्ज करण्यापूर्वी गांगुलीला हितसंबंध जपण्याच्या मुद्दा उपस्थित होईल अशा सर्व पदांचा राजीनामा द्यावा लागणार आहे. कॅबच्या अध्यक्षपदाव्यतिरिक्त गांगुली दिल्ली कॅपिटल्स संघाचा मार्गदर्शक आहे.  त्यामुळे त्याला हेही पद सोडावं लागणार आहे. 

सौरव गांगुलीचं ठरलंय... BCCIच्या अध्यक्षपदाची सूत्र हाती घेताच सर्वप्रथम करणार 'हे' काम!
बीसीसीआयची सध्याची प्रतीमा ही तितकीशी चांगील नाही, त्यामुळे सर्वप्रथम ती सुधारण्याचं काम करणार असल्याचे गांगुलीनं सांगितले. तो म्हणाला,''देशासाठी खेळलो आणि नेतृत्वही केलं, त्यामुळे ही नवीन जबाबदारी स्वीकारताना आनंद होत आहे. पण, मागील तीन वर्षांत बीसीसीआयची अवस्था बिकट झालेली आहे आणि अशा परिस्थितीत माझ्याकडे अध्यक्षपद आले आहे. बीसीसीआयच्या प्रतिमेला तडा गेलेला आहे आणि ती सुधारण्याची संधी मला मिळाली आहे.''

47 वर्षीय गांगुली सध्या बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष आहे. तो म्हणाला,''प्रथम श्रेणी क्रिकेटपटूंच्या वेतन श्रेणीत सुधारणा करण्याचे पहिले लक्ष्य असेल. त्यासाठी सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. मी गेली तीन वर्ष प्रशासकिय समितीकडे याबाबत मागणी करत आहे, परंतु त्यांच्याकडून काणाडोळा केला गेला. त्यामुळे आता तो मुद्दा निकाली लावण्याचे पहिले ध्येय आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटपटूंचा आर्थिक प्रश्न सोडवायचा आहे.'' 


Web Title: Sourav Ganguly may be subjected to conflict of interest inquiry after being chosen as new BCCI president
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.