Sourav Ganguly accepted BCCI's presidency | सौरव गांगुलीने स्वीकारला बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा कारभार
सौरव गांगुलीने स्वीकारला बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा कारभार

मुंबई : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने आज अखेर बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. बीसीसीआयचे अध्यक्षपद सांभाळणारा गांगुली हा फक्त दुसरा कर्णधार ठरला आहे.

भारतीय क्रिकेटसाठी चांगले कार्य करण्याची मोठी संधी मला मिळाली आहे. कारण बीसीसीआयची प्रतिमा खराब झालेली असताना मला या संघटनेच्या अध्यक्षपदी विराजमान होण्याची संधी मिळाली आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) नवे अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी व्यक्त केली होती.

काही दिवसांपूर्वी काय घडले होते
जगातील सर्वात शक्तिशाली आणि धनाढ्य क्रिकेट मंडळ असलेल्या बीसीसीआच्या अध्यक्षपदासाठी अनुराग ठाकूर आणि एन. श्रीनिवासन या दोन माजी गट आमने-सामने होते. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शह-काटशहाचे अनेक डाव रंगले. एका गटाने सौरव गांगुलीचे नाव पुढे केले होते. तर श्रीनिवासन यांच्या गटाने आपले वजन बृजेश पटेल यांच्या पारड्यात टाकले होते. या बैठकीत सीओए विरुद्ध देशातील सर्व क्रिकेट संघटना मिळून मोर्चेबांधणी करत होत्या. अखेर अध्यक्षपदासाठी झालेल्या खलबतांमध्ये गांगुलीचे पारडे जड ठरले. 

बीसीसीआयवर आपल्या गटाचे नियंत्रण असावे, यासाठी अनुराग ठाकूर आणि एन. श्रीनिवासन यांच्या गटांनी जोर लावला होता. अखेरीस सौरव गांगुलीच्या नावावर एकमत झाले. बृजेश पटेल यांना आयपीएलचे चेअरमन बनवण्यावर एकमत झाले. अमित शहांचे चिरंजीव जय शहा यांची सचिवपदी निवड झाली तर अरुण सिंह ठाकूर यांची खजिनदारपदी निवड झाली.


अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी गांगुली यांनी अर्ज भरला. या वेळी एन. श्रीनिवासन, राजीव शुक्ला व निरंजन शहा हे दिग्गज क्रिकेट प्रशासकही उपस्थित होते. गांगुलीशिवाय इतर कोणीही अध्यक्षपदासाठी अर्ज न भरल्याने गांगुली यांच्या अध्यक्षपदाच्या घोषणेची औपचारिकता उरली आहे.


Web Title: Sourav Ganguly accepted BCCI's presidency
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.