Shubman Gill breaks Virat Kohli’s 10-year-old record in Deodhar Trophy Final | शुबमन गिलचा Record; विराट कोहलीचा दहा वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
शुबमन गिलचा Record; विराट कोहलीचा दहा वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

भारताचा युवा फलंदाज शुबमन गिलने सोमवारी देवधर चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विक्रमाला गवसणी घातली. पंजाबच्या या खेळाडूकडे भारत C संघाचे नेतृत्व आहे, धावांचा पाठलाग करताना गिल एक धाव करून माघारी परतला. पण, त्यानं या सामन्यात विराट कोहलीचा 10 वर्षांपूर्वीचा विक्रम स्वतःच्या नावावर केला. प्रथम फलंदाजी करताना भारत B संघाने निर्धारित 50 षटकांत 7 बाद 283 धावा चोपल्या. यशस्वी जयस्वाल, केदार जाधव, विजय शंकर यांनी दमदार खेळी केली, परंतु यात के गौथमची फटकेबाजी भाव खावून गेली. 

प्रथम फलंदाजी करताना भारत B संघाचे सलामीवीर अवघ्या 28 धावांत माघारी परतले. ऋतुराज गायकवाड ( 0) आणि कर्णधार पार्थिव पटेल ( 14) यांना इशार पोरेलने माघारी पाठवले. त्यापाठोपाठ बाबा अपराजितही ( 13) जलाज सक्सेनानं पायचीत झाला. पण, त्यानंतर जयस्वाल आणि केदार यांनी संघाचा डाव सावरला. या दोघांनी 79 धावांची भागीदारी केली. जयस्वालने 79 चेंडूंत 5 चौकार व 1 षटकार खेचून 54 धावांची खेळी केली. अक्षर पटेलनं ही जोडी तोडली.

नितीश राणा ( 20) पोरेलच्या गोलंदाजीवर माघारी परतला. विजय शंकरने केदारला तोलामोलाची साथ दिली. केदारने 94 चेंडूंत 4 चौकार व 4 षटकार खेचून 86 धावा केल्या. शंकरने 33 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकार खेचून 45 धावा केल्या. या दोघांनाही पोरेलनं माघारी पाठवले. पोरेलनं 43 धावांत पाच विकेट्स घेतल्या. पण, 49व्या षटकात आलेल्या गौथमनं दिवेश पठानीयाच्या एका षटकात तुफान फटकेबाजी केली. त्यानं 3 षटकार व 3 चौकार खेचून 10 चेंडूंत नाबाद 35 धावा केल्या. यातील 26 धावा या दिवेशच्या षटकात खेचल्या. 

लक्ष्याचा पाठलाग करताना मयांक अग्रवाल आणि शुबमन सलामीला आले. पण, शुबमन 1 धाव करून मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर माघारी परतला. तत्पूर्वी मैदानावर पाऊल ठेवताच त्यानं कोहलीचा विक्रम मोडला. देवधर चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नेतृत्वाची जबाबदारी पार पाडणारा तो सर्वात युवा कर्णधार ठरला. हा विक्रम विराट कोहलीनं 2009-10च्या स्पर्धेत नोंदवला होता. उत्तर विभागाचे नेतृत्व करताना तेव्हा विराट 21 वर्ष व 142 दिवसांचा होता. शुबमन आज 20 वर्ष 57 दिवसांचा आहे.  

Web Title: Shubman Gill breaks Virat Kohli’s 10-year-old record in Deodhar Trophy Final

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.