पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी कोरोना व्हायरसच्या संकटात समाजकार्य करत आहे. कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे आणि त्यामुळे अनेक कुटुंबांनवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा कुटुंबीयांना आफ्रिदी जीवनावश्यक वस्तू पुरवत आहे. दोन दिवसांपूर्वी त्या पाकिस्तानातील हिंदुना मदत करण्यासाठी लक्ष्मी नारायण मंदिरात गेला होता. त्यानं तसे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. आता आफ्रिदी बांगलादेशच्या मदतीला धावला आहे. त्यानं क्रिकेटच्या माध्यमातून ही मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तानातल्या मंदिरात शाहिद आफ्रिदी करतोय जीवनावश्यक वस्तूंचं वाटप
बांगलादेशमध्येही कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी सरकारच्या मदतीला अनेक बांगलादेशी खेळाडू पुढे आले. काहींनी आपला निम्मा पगार दान केला, तर काहींनी विविध माध्यमातून निधी गोळा करून हातभार लावला. बांगलादेशचा फलंदाज मुशफिकूर रहीम यानं गेल्या महिन्यात याच समाजकार्यासाठी त्याच्या बॅटचं लिलाव करण्याचा निर्णय घेतला होता. कसोटी कारकिर्दीतील पहिले द्विशतक त्यानं या बॅटीतून झळकावले होते. 2013मध्ये त्यानं श्रीलंकाविरुद्ध हा पराक्रम केला होता.
रहीमनं आतापर्यंत तीन द्विशतकं झळकावली आहेत. कोरोना व्हायरसच्या संकटात बांगलादेशला मदत करण्यासाठी त्यानं लिलावात ठेवलेली बॅट 20 हजार डॉलर म्हणजे जवळपास 15 लाख रुपयांत आफ्रिदीनं खरेदी केली. या निधीतून बांगलादेशातील गरीबांना मदत केली जाणार आहे. यापूर्वी इंग्लंडचा फलंदाज जोस बटलर यांनेही त्याची वर्ल्ड कप विजेती जर्सीचा लिलाव करून 62 लाख रुपये जमवले होते.
शाहिद आफ्रिदी फाऊंडेशन पाकिस्तानात गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करत आहे. आतापर्यंत या फाऊंडेशननं 22 हजार कुटुंबीयांना अन्नाचं वाटप केलं आहे. आफ्रिदी म्हणाला,''रहीम तू तुझ्या देशासाठी मोठ काम करत आहेत. या संकट काळात आपण एकमेकांना मदत करायला हवी. मला बांगालदेशातील जनतेकडून भरभरून प्रेम मिळालं आहे आणि यापुढेही मिळत राहील.''