मुंबई : क्रिकेटपटू आणि त्यानंतर समालोचक झालेले आॅस्ट्रेलियाचे माजी खेळाडू डीन जोन्स यांच्या निधनामुळे क्रिकेट वर्तुळात शोकलहर पसरली आहे. जोन्स यांचे गुरुवारी मुंबईत हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ५९ वर्षीय जोन्स अलीकडे यूएईमध्ये खेळल्या जात असलेल्या आयपीएलच्या १३ व्या पर्वादरम्यान समालोचन संघाचे सदस्य म्हणून मुंबईत होते. जोन्स यांच्या निधनावर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली व प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह अनेक दिग्गजांनी शोक व्यक्त केला.
समालोचक म्हणून ओळख निर्माण केली
जोन्स संपूर्ण आशियात क्रिकेटच्या विकासासोबत स्वत:ला जोडणारे खेळाडू महान अॅम्बेसॅडरपैकी एक होते. ते नव्या प्रतिभांचा शोध घेत असत आणि युवा क्रिकेटपटूंना प्रोत्साहित करीत होते. ते शानदार समालोचक होते. त्यांनी आपल्या आवाजाने लाखो चाहत्यांना आनंद दिला.
डीन जोन्स यांच्या निधनाचे वृत्त हृदयद्रावक आहे. ते चांगले व्यक्ती होते. आॅस्ट्रेलियाच्या माझ्या पहिल्या दौऱ्यादरम्यान त्यांच्याविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो व ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना हे दु:ख पचविण्याची क्षमता प्रदान करो.- सचिन तेंडुलकर
डीन जोन्स यांच्या निधनाचे वृत्त ऐकल्यानंतर धक्का बसला. ईश्वराने त्यांचे कुटुंबीय व मित्रांना हा धक्का पचविण्याची शक्ती प्रदान करावी. - विराट कोहली
एक सहकारी व एक प्रिय मित्र डीन जोन्स यांना गमाविल्याचे वृत्त धक्कादायक आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. - रवी शास्त्री
डीन जोन्स यांच्या निधनाचे वृत्त कळताच धक्का बसला. या वृत्तावर विश्वास बसत नव्हता. ते माझे आवडते समालोचक होते. त्यांच्यासोबतच्या अनेक आठवणी आहेत. त्यांची आठवण येत राहील. - वीरेंद्र सेहवाग