एक्स्पर्ट कमेंट: अयाज मेमन, कन्सल्टिंग एडिटर
टी -२० -२० आणि कसोटीतून निवृत्ती जाहीर करणारे दिग्गज फलंदाज विराट कोहली तसेच रोहित शर्मा यांचे भारतीय एकदिवसीय संघात स्थान निर्माण होऊ शकेल? निवड समितीपुढे हा गंभीर प्रश्न आहे. विराट आणि रोहित वन डेत महान फलंदाज आहेत. २०२७ चा विश्वचषक खेळून भारताला जेतेपद मिळवून देण्याची दोघांचीही इच्छा आहे.
निवडीचा फार्मूला काय?
सर्वांत मोठा प्रश्न हा की विराट आणि रोहित यांचा फॉर्म आणि फिटनेस तपासण्याचा फार्मूला काय असावा. दोघे टी-२० आणि कसोटी सामने खेळत नाहीत. अशावेळी त्यांची प्रगती कशी तपासायची? दरम्यान अशीही चर्चा आहे की, भारतीय संघ वन डे मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. या दोघांना दौऱ्यात स्थान देत ऑस्ट्रेलियात या दोन्ही खेळाडूंना निरोप देण्यात येईल. मात्र या दोघांनी वन डेतील आपल्या निवृत्तीबाबत अद्याप शब्द उच्चारलेला नाही. उलट दोघेही विश्वचषक खेळण्यास इच्छुक आहेत. विश्वचषक अद्याप दोन वर्षे दूर आहे.
विक्रमांच्या बळावर स्थान मिळेल?
खेळाडूंमध्ये परस्पर स्पर्धा फार तगडी आहे. यामुळे कोणीही स्वतःचे स्थान पक्के मानू शकत नाही. मग रोहित आणि विराट देखील अपवाद कसे असू शकतील? या दोघांना निवड समितीला आपल्या फॉर्मचे महत्त्व पटवून द्यावे लागेल. ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे हे वन डे साठी सज्ज आहेत. अशा वेळी विराट आणि रोहितचे संघातील स्थान डळमळीत असेल. प्रतिभावान युवा खेळाडूंपुढे रोहित आणि विराट स्वतःच्या विक्रमांच्या बळावर संघात स्थान कसे काय मिळू शकतील, हा मोठा प्रश्न आहे.
निवड समितीची डोकेदुखी
निवड समिती द्विधा मनःस्थितीत आहे. सध्या कोणत्याही प्रकारात भारतीय संघ निवडण्यासाठी प्रतिभावान खेळाडू मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौऱ्यात याची झलक पाहायला मिळाली. या दौऱ्यात रोहित, विराट आणि अश्विन नव्हते, हे विशेष. युवा खेळाडूंनी या दिग्गजांची उणीव जाणवू दिली नाही. ५ सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत सोडविण्यात युवा खेळाडूंनी पराकाष्ठा केली. या दौऱ्यात ७५४ धावा काढणारा कसोटी कर्णधार शुभमन गिल हाही टी-२० संघात स्थान मिळवू शकेल, याची खात्री नाही. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टी-२० संघ आधीपासूनच भक्कम आहे.
आपसांत सामने खेळवा...
- वनडेसाठी भविष्यकालीन संघ बांधणी करायची झाल्यास खेळाडूंना निवडण्यासाठी मानदंड तयार हवेत.
- खेळाडूंचे तीन-चार संघ तयार करून परस्परांमध्ये सामने किंवा स्पर्धा खेळवावी. या आधी चॅलेंजर्स ट्रॉफीचे आयोजन अशा प्रकारे व्हायचे.
- या स्पर्धेतील सामन्यांमधील खेळाडूंची कामगिरी निवडीसाठी विचारात घेण्यात यावी.
- अशा उत्कृष्ट खेळाडूंना ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी वनडे संघात स्थान द्यावे.
- ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही या खेळाडूंचा फॉर्म आणि फिटनेस यांची चाचणी घेता येईल.
पुनरागमनाची इच्छा...
संघात परिवर्तन होणे अटळ असते. खेळाडू ही बाब चांगल्या प्रकारे जाणतात. विराट आणि रोहित यांची वनडे खेळण्याची इच्छा कौतुकास्पद असली, तरी ती पूर्ण करण्यासाठी फॉर्म व फिटनेस सिद्ध करणे गरजेचे आहे. ते असेल, तरच दोघांना बाहेर ठेवता येणार नाही.
Web Title: Rohit Sharma-Virat Kohli not only have a great record for the ODI World Cup, form and fitness are also important!
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.