Ravi Shastri makes one MAJOR request to CAC members during coach-selection interview: Report | रवी शास्त्रींनी मुलाखतीत सल्लागार समितीकडे केली महत्त्वाची मागणी

रवी शास्त्रींनी मुलाखतीत सल्लागार समितीकडे केली महत्त्वाची मागणी

मुंबई : भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांच्या नावाची फेरनिवड झाली. कपिल देव हे प्रमुख असलेल्या त्रिसदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीनं शुक्रवारी शास्त्रींच्या नावाची घोषणा केली. 2021च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत शास्त्री भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहणार आहेत. प्रशिक्षकपदासाठी शास्त्रींसह पाच जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या आणि त्यानंतर ही निवड जाहीर करण्यात आली. या मुलाखतीदरम्यान सल्लागार समितीकडे एक महत्त्वाची मागणी केल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुलाखतीत शास्त्रींना वर्ल्ड कप स्पर्धेतील मधल्या फळीच्या फलंदाजांच्या अपयशाबद्दल विचारणा करण्यात आली होती. त्यावर उत्तर देताना शास्त्रींनी भारतीय संघाच्या निवड प्रक्रियेबाबत एक विनंती समितीकडे केली. ''शास्त्रींना संघ निवड प्रक्रियेपासून दूर ठेवले होते. वर्ल्ड कप स्पर्धेसाठी मधल्या फळीत जो फलंदाज संघ व्यवस्थापनाला हवा होता, त्याची निवड केली गेली नाही. त्याशिवाय संघ व्यवस्थापनाला संघ निवडीच्या बैठकीत मत मांडण्याचा अधिकारही नव्हता. त्यामुळे संघ निवडताना कर्णधार आणि प्रशिक्षक या दोघांची मतं जाणून घेतले जावे, अशी मागणी शास्त्रींनी केली आहे,'' असे सल्लागार समितीतील सदस्याने सांगितले.

भारत वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडविरुद्ध का हरला, या प्रश्नावर शास्त्रींनी दिले भन्नाट उत्तर
भारत न्यूझीलंडविरुद्ध का हरला, असा प्रश्न सल्लागार समितीने शास्त्री यांना विचारला. या प्रश्नावर शास्त्रींनी भन्नाट उत्तर दिले. शास्त्री म्हणाले की, " क्रिकेटमध्ये प्रत्येक दिवस महत्वाचा असतो. पण तो दिवस तुमच्यासाठी कसा असेल हे सांगता येत नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याचा दिवस आमचा नव्हता. पण एखादा दिवस तुमच्या बाजूने नसेल तर तुमचा संघ वाईट ठरत नाही."

रवी शास्त्रींनी 'ही' एकच गोष्ट सांगितली आणि प्रशिक्षकपदाची माळ गळ्यात पडली
ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू टॉम मूडी आणि न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू व आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचे माजी प्रशिक्षक माइस हेसन यांच्यासह 2007 सालच्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप  विजेत्या भारतीय संघाचे तत्कालीन व्यवस्थापक लालचंद राजपूत, मुंबई इंडियन्सचे माजी प्रशिक्षक रॉबिन सिंग, वेस्ट इंडिजचे फिल सिमन्स यांनीही या पदासाठी अर्ज केले होते. पण, मुलाखतीपूर्वी सिमन्स यांनी वैयक्तिक कारणास्तव माघार घेतली. शास्त्री भारतीय संघासोबत वेस्ट इंडिज दौऱ्यावर असल्यामुळे त्यांची मुलाखत व्हिडीओ कॉन्फरन्सने घेण्यात आली. त्यांनी सर्वात शेवटी मुलाखत दिली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शास्त्री यांनी स्काइपद्वारे आपली मुलाखत दिली. यावेळी त्यांनी आपले ध्येय अजूनही यशस्वी पूर्ण झालेले नाही, हे त्यांनी सांगितले. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ चांगली कामगिरी करत आहे. आता यापुढे २०२० आणि २०२१ साली विश्वचषक होणार आहे. हे विश्वचषक माझ्या डोळ्यापुढे आहेत, असे शास्त्री यांनी सल्लागार समितीला सांगितले.
 

Web Title: Ravi Shastri makes one MAJOR request to CAC members during coach-selection interview: Report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.