The quality of the game is nowhere low | खेळाचा दर्जा कुठेही कमी नाही, क्रिकेटला पुन्हा सुरुवात

खेळाचा दर्जा कुठेही कमी नाही, क्रिकेटला पुन्हा सुरुवात

अयाझ मेमन

इंग्लंड-वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेने आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा एकदा सुरू झाले. कोरोनाच्या काळामध्ये या मालिकेचे आयोजन होत असताना अनेक अडचणी येण्याची शक्यता होती, मात्र जोफ्रा आर्चरने जैवसुरक्षाबाबतचे केलेले उल्लंघन मूर्खपणाचे ठरले आणि त्याला दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघातील स्थानही गमवावे लागले. या एका घटनेचा अपवाद वगळता संपूर्ण मालिकेत कोणतीही अडचण आली नाही. तीन सामन्यांची ही मालिका चांगलीच रंगली. तिसºया कसोटीत विंडीज संघ पूर्णपणे ढेपाळला. मात्र त्याआधीच्या दोन्ही सामन्यात तुल्यबळ खेळ पाहण्यास मिळाला. विंडीजचा कर्णधार जेसन होल्डर आणि त्याच्या संघापुढे इंग्लंडला एक प्रकारे झुंजावेच लागले. मात्र इंग्लंडने लढवय्या खेळ करत बाजी मारली. पहिला सामना जिंकल्यानंतर विंडीजने दुसरा सामना थोडक्यात गमावला आणि यामुळे तिसºया सामन्यावरून त्यांचे लक्ष काहिसे विचलित झाले. याचाच त्यांना फटका बसला.

पहिला सामना गमावून पिछाडीवर पडल्यानंतर मालिका विजयासाठी केलेला निर्धार इंग्लंडच्या शैलीतून स्पष्ट दिसून आला. घरच्या मैदानावर खेळताना अनुकूल परिस्थितीमध्ये पिछाडीवर पडल्यानंतरही बाजी मारणे कधीच सोपे नसते. शिवाय संभाव्य विजेते म्हणून गणले जात असताना काहिसे मानसिक दडपणही संघावर असते. मात्र इंग्लंडने या सर्व आव्हानांना यशस्वीपणे तोंड दिले.
इंग्लंडला या मालिकेत दोन अनुभवी खेळाडूंच्या आक्रमकतेचा मोठा फायदा झाला, ते खेळाडू म्हणजे बेन स्टोक्स आणि स्टुअर्ट ब्रॉड. अष्टपैलू खेळाच्या जोरावर स्टोक्सची नक्कीच सध्याच्या सर्वोत्तम खेळाडूंमध्ये गणना होते. या मालिकेतही त्याने आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर छाप पाडली. त्याच्यामध्ये नक्कीच सर्वकालीन सर्वोत्तम खेळाडू बनण्याची क्षमता आहे. दुसरीकडे, माझ्या मते ब्रॉडची कामगिरी अधिक आकर्षक होती. मालिकेतील खेळाडूंची कामगिरी पाहता आणि त्याच्या वयानुसारही त्याने केलेला खेळ जबरदस्त होता. दुसºया आणि तिसºया कसोटीत त्याने केलेला भेदक मारा इंग्लंडच्या विजयात मोलाचे योगदान ठरला. याशिवाय त्याने अखेरच्या कसोटीत महत्त्वपूर्ण अर्धशतकही झळकवले. यामुळे इंग्लंडला विंडीजवर एकहाती वर्चस्व मिळवण्यात मदत झाली. इंग्लिश वातावरणामध्ये ब्रॉडची भेदकता सर्वांनाच माहीत आहे. दोन्ही बाजूला चेंडू स्विंग करण्याची क्षमता आणि मारा करताना तो आपल्या उंचीचा पूर्ण उपयोग करीत असल्याने फलंदाज त्याच्यापुढे अडखळतात. उपमहाद्वीपामध्ये फारसे यश न मिळताही त्याने मिळवलेले ५०० कसोटी बळी त्याची क्षमता दाखवून देण्यास पुरेसे आहेत. त्याची जेम्स अँडरसनसोबतची भागीदारीही शानदार ठरली असून, दोघांनी मिळून आतापर्यंत जवळपास ११०० बळी घेतले आहेत. यामुळेच खेळाच्या इतिहासामध्ये दोघांचा समावेश दिग्गज वेगवान गोलंदाजांमध्ये होत आहे. महत्त्वाचे म्हणजे, २०१९ सालच्या अ‍ॅशेस मालिकेपासून ब्रॉड कसोटीमध्ये सर्वाधिक बळी घेणारा वेगवान गोलंदाज ठरला आहे. पहिल्या कसोटीसाठी ब्रॉडला वगळण्यात आले होते. जेव्हा तुम्ही ३४ वर्षांचे असता, तेव्हा नक्कीच कोणत्याही खेळाडूसाठी ही चांगली बाब नसते. मात्र यानंतर ब्रॉडने दुसºया व तिसºया कसोटीत भेदक मारा करताना निवडकर्त्यांना चुकीचे ठरविले.
या मालिकेने दोन महत्त्वाच्या गोष्टीही समोर आणल्या. पहिली म्हणजे, कोरोना महामारी संपेपर्यंत कशाप्रकारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे आयोजन करता येईल, याचा एक पर्याय या मालिकेने दिला. दुसरी गोष्ट म्हणजे, स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या असलेल्या अनुपस्थितीमुळे कामगिरीवर फारसा परिणाम होत नाही.

आर्चरने नियमांचे उल्लंघन केल्याच्या घटनेचा अपवाद वगळता संपूर्ण मालिकेत कोणतीही अडचण आली नाही. खेळाडूंची वेळोवेळी कोरोना चाचणी करण्यात येत होती. याशिवाय चेंडूला लाळ लावणे, आनंद साजरा करताना हस्तांदोलन करणे, आलिंगन देणे असे प्रकार कटाक्षाने टाळण्याचा प्रयत्नही खेळाडूंकडून झाला. यामुळे प्रोत्साहनही मिळाले. खेळाडूंनी उद्भवलेल्या परिस्थितीमुळे अनेक बदल अंगिकारले असल्याचे दिसले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रेक्षकांविना झालेल्या सामन्यांमध्ये खेळाचा दर्जा मात्र कुठेही कमी झालेला दिसला नाही. तरी आर्थिक खर्चाचा प्रश्न कायम राहतो. कारण जैव सुरक्षित वातावरण निर्माण करणे अत्यंत खर्चिक बाब आहे. त्यामुळे भविष्यात सामने आयोजित करताना या सर्व गोष्टींचा अतिरिक्त ताण पडेल. इतर क्रिकेट बोर्डांच्या तुलनेत इंग्लंड, आॅस्टेÑलिया आणि भारत या देशांसाठी ही बाब फारशी खर्चिक नसेल.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The quality of the game is nowhere low

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.