मेलबोर्न : आघाडीच्या आॅस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी आकर्षित करणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) तुलनेत देशातील स्थानिक स्पर्धेला प्राधान्य द्यायला हवे. कारण क्रिकेट आॅस्ट्रेलिया त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करते, असे आॅस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपेल यांनी म्हटले आहे.
सध्या जवजवळ १३ आॅस्ट्रेलियन क्रिकेटपटूंकडे आयपीएल फ्रॅन्चायझींचे करार आहे. त्यात प्रमुख वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सला कोलकाता नाईटरायडर्सकडून १५.५ कोटी रुपयांचा करार मिळाला आहे. त्यामुळे तो या लीगमधील सर्वांत महागडा विदेशी खेळाडू ठरला आहे.
जर आॅस्ट्रेलियातील टी-२० विश्वकप स्पर्धा स्थगित झाली तर कोविड-१९ महामारीमुळे अनिश्चित कालावधीसाठी स्थगित झालेले आयपीएलचे १३ वे पर्व आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आयोजित केल्या जाऊ शकते, अशी चर्चा आहे. असे जर घडले तर आयपीएल व आॅस्ट्रेलियातील स्थानिक क्रिकेट एकाचवेळी होईल. त्यात शेफिल्ड शील्ड व वन-डे कप आदी स्पर्धांचा समावेश आहे.
चॅपेल म्हणाले, ‘अलीकडच्या कालावधीत क्रिकेट आॅस्ट्रेलिया आघाडीच्या खेळाडूंची चांगली काळजी घेते. जर आॅस्ट्रेलियात कमी मिळकत असणारा खेळाडू आहे आणि त्याला आयपीएलमध्ये घसघशीत रक्कम मिळणार असेल आणि जर मी क्रिकेट आॅस्ट्रेलिया बोर्डाचा सदस्य असेल तर मला त्याच्याबाबत सहानुभूती असू शकते.’
चॅपेल पुढे म्हणाले, ‘आघाडीच्या खेळाडूंना चांगले वेतन मिळते. त्यामुळे ही बाब येथे लागू होत नाही. त्यांची बांधिलकी आॅस्ट्रेलियासाठी असायला हवी.’ अनेक आॅस्ट्रेलियन खेळाडूंनी यंदा आयपीएल झाले तर या टी-२० लीगमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यात कमिन्स व डेव्हिड वॉर्नर यांचाही समावेश आहे.(वृत्तसंस्था)