Year Ender 2023: कुठे हसू तर कुठे अश्रू! भारताचे मोठे विक्रम पण ऑस्ट्रेलियाने दोनदा हृदयं तोडली

भारतीय क्रिकेटसाठी २०२३ हे वर्ष चांगल्या आणि वाईट अशा अशा दोन्ही आठवणींसह संमिश्र ठरले.

या वर्षाच्या सुरुवातीला टीम इंडियाने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाचा २-१ असा पराभव केला आणि सलग दुसऱ्यांदा जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. याशिवाय टीम इंडियाने वन डे आणि ट्वेंटी-२० मालिकेतही ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेत भारताचे नेतृत्व नवीन कर्णधार सूर्यकुमार यादवने केले आणि टीम इंडियाने मालिका ४-१ ने जिंकली.

भारतीय संघ मागील काही वर्षांपासून कसोटी, वन डे आणि ट्वेंटी-२० अशा सर्व फॉरमॅटमध्ये सातत्याने चमकदार कामगिरी करत आहे. या वर्षीही टीम इंडियाने तिन्ही फॉरमॅटमध्ये अप्रतिम कामगिरी केली आणि नंबर वन संघ बनण्याचा मान पटकावला.

पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानात झालेल्या आशिया चषकात भारताने आपला विजयरथ कायम ठेवला. विश्वचषक सुरू होण्यापूर्वी टीम इंडियासमोर आशिया चषक जिंकण्याचे आव्हान होते. भारताने साखळी फेरीत पाकिस्तानचा पराभव केला आणि त्यानंतर अंतिम सामन्यात श्रीलंकेला अवघ्या ५० धावांत गारद करून वर्चस्व गाजवत आशिया चषक उंचावला.

भारतीय संघाशिवाय विराट कोहलीसाठी देखील हे वर्ष खूप खास राहिले. कारण याच वर्षात विराटने त्याचा आदर्श सचिन तेंडुलकरसमोर विश्वविक्रम नोंदवून शतकांचे अर्धशतक पूर्ण केले. विराटने सचिन तेंडुलकरचा ४९ शतकांचा विक्रम मोडून आपल्या कारकिर्दीतील ५० वे वन डे शतक झळकावले.

वन डे विश्वचषकात भारताने सलग १० विजय मिळवून अंतिम फेरी गाठली. पण, अंतिम फेरीत भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला. सलामीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियालाच नमवून भारताचा विजयरथ सुरू झाला होता.

बलाढ्य ऑस्ट्रेलियाने २०२३ या वर्षात दोनदा तमाम भारतीयांच्या हृदयं तोडली. ऑस्ट्रेलियाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विजय मिळवून भारताच्या स्वप्नाचा चुराडा केला. टीम इंडियाला दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला.

सलग १० सामने जिंकून अंतिम फेरी गाठणारा भारतीय संघ विश्वचषक उंचावेल असे अपेक्षित होते. मात्र, कांगारूंनी मोठा धक्का देत भारताचा विजयरथ रोखला आणि सहाव्यांदा विश्वचषक जिंकला. टीम इंडियासाठी यंदाच्या वर्षातील हा सर्वात वाईट क्षण ठरला.

३५ वर्षीय रोहित शर्मा या विश्वचषकात टीम इंडियाचे नेतृत्व करत होता आणि त्याने कर्णधार आणि फलंदाज म्हणून टीम इंडियाला चॅम्पियन बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. त्याने आपल्या कर्णधारपद आणि फलंदाजीपुढे जगातील प्रत्येक संघाला झुकवले, पण, अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला झुकवता आले नाही अन् रोहितला अश्रू अनावर झाले.

विश्वचषक संपल्यानंतर टीम इंडियाच्या निवडकर्त्यांनी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. तीन फॉरमॅटचे तीन कर्णधार आणि तीन वेगवेगळ्या संघांची निवड करण्यात आली. या निवडीतील विशेष बाब म्हणजे मागील १५-१६ वर्षांपासून भारतीय आणि जागतिक क्रिकेटवर राज्य करणाऱ्या विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना वनडे आणि ट्वेंटी-२० संघात समावेश झाला नाही. खरं तर रोहित आणि विराटनेच यातून माघार घेतली असल्याचे बीसीसीआयने सांगितले.

दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या कसोटी मालिकेतून विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचे पुनरागमन झाले. पण, अनुभवी चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना या मालिकेत संधी मिळाली नाही. त्यामुळे या स्टार खेळाडूंची कारकीर्द संपुष्टात आली का अशी चर्चा रंगली आहे.