Ellyse Perry ची क्रिकेट विश्वात खळबळ; नोंदवला एकाही पुरुष खेळाडूला न जमलेला

WPL 2024 - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने महिला प्रीमिअर लीग २०२४ च्या प्ले ऑफमधील आपली जागा निश्चित केली आहे. करो वा मरो लढतीत काल त्यांनी गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर ७ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला.

६ विकेट्स व नाबाद ४० धावा करणारी एलिसे पेरी ( Ellyse Perry ) ही या विजयाची शिल्पकार ठरली. महिला प्रीमिअर लीगमध्ये एका डावात सहा विकेट्स घेणारी ती पहिली खेळाडू ठरली.

तिने ४-०-१६-६ अशी भन्नाट स्पेल टाकली आणि ५ चौकार व १ षटकाराच्या मदतीने नाबाद ४० धावा करून विजयी फटका खेचला. या खेळीसह तिने क्रिकेट विश्वात आतापर्यंत एकाही पुरुष किंवा महिला खेळाडूला न जमलेला मोठा विक्रम नावावर केला आहे.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ १९ षटकांत ११३ धावांवर तंबूत परतला. सजीवन संजाना ( ३०) व हेली मॅथ्यू ( २६) हे ओपनर्स वगळता मुंबईच्या एकाही फलंदाजाचा एलिसा पेरीसमोर निभाव लागला नाही. RCBने पेरी ( ४०) व रिचा घोष ( ३६) यांच्या नाबाद खेळीच्या जोरावर १५ षटकांत ३ बाद ११५ धावा करून विजय निश्चित केला.

एलिसे पेरी ही ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये एकाहून अधिक शतक व डावात पाच विकेट्स घेणारी जगातील पहिली ( पुरुष-महिला) खेळाडू आहे. तिने २०१८ मध्ये पर्थ स्कॉर्चर्स ( नाबाद १०२) व ब्रीस्बन हिट ( नाबाद १०३) यांच्याविरुद्ध शतक झळकावले होते, तर २०२३ मध्ये मेलबर्न रेनेगेड्स ( ५-२२) व २०२४ मध्ये मुंबई इंडियन्स ( ६-१५) यांच्याविरुद्ध डावात पाच किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या होत्या.

प्रथम श्रेणी, लिस्ट ए आणि ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये शतक व डावात ६ विकेट्स घेणारी एलिसे पेरी ही जगातील पहिली ( पुरुष व महिला) क्रिकेटपटू आहे. तिने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये नाबाद २१३ धावा व ३२ धावांत ६ विकेट्स, लिस्ट ए क्रिकेटमध्ये १४७ धावा व २२ धावांत ७ विकेट्स आणि ट्वेंटी-२०त नाबाद १०३ धावा व १५ धावांत ६ विकेट्स अशी सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी केली आहे.