पाकिस्तानसमोर 'करा किंवा मरा'ची स्थिती; सेमी फायनलमध्ये जागा मिळवण्यासाठी वाट अवघड

World Cup 2023 Semi Final scenario for Pakistan : ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पराभवामुळे पाकिस्तानी संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे.

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पराभवामुळे पाकिस्तानी संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे. आताच्या घडीला पाकिस्तान २०२३च्या आयसीसी विश्वचषकाच्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर पोहोचला आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारल्यानंतर पाकिस्तानी संघ बॅकफूटवर गेला आहे. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियन संघाचे सध्या ४-४ गुण आहेत. पण, नेटरनरेटच्या बाबतीत पाकिस्तान अद्याप पिछाडीवर आहे.

दोन मोठ्या दारूण पराभवानंतर पाकिस्तानचा उपांत्य फेरी गाठण्याचा मार्ग कठीण होताना दिसत आहे.

सध्या पाकिस्तानी संघाने ४ सामने खेळले असून २ सामने जिंकण्यात त्यांना यश आले आहे. पाकिस्तान चार गुणांसह (-०.४५६) आता पाचव्या स्थानी स्थित आहे.

ऑस्ट्रेलियाने देखील दोन सामने जिंकले आहेत पण त्यांच्या नेटरनरेट पाकिस्तानपेक्षा चांगला आहे. सलग दोन सामने जिंकून ऑस्ट्रेलियन संघाने आपली स्थिती सुधारली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने चमकदार कामगिरी केली.

सध्या ऑस्ट्रेलियाचा नेटरनरेट -०.१९३ आहे. अशा स्थितीत आता पाकिस्तानला टॉप-४ मध्ये स्थान मिळवण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे कडवे आव्हान असणार आहे.

पाकिस्तानी संघाला आता उरलेले सामने मोठ्या फरकाने जिंकून आपल्या नेटरनरेटमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. पाकिस्तान उरलेल्या सामन्यांमध्ये अफगाणिस्तान, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि इंग्लंड या संघांशी भिडणार आहे.

पाकिस्तानला उपांत्य फेरीत जागा मिळवण्यासाठी उरलेले सर्व पाच सामने कोणत्याही परिस्थितीत जिंकावे लागतील. एका सामन्यातील पराभवामुळे देखील पाकिस्तानचा खेळ बिघडू शकतो.

उरलेले पाचही सामने जिंकल्यास पाकिस्तानचे एकूण गुण १४ होतील, ज्यामुळे संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीत राहील.

दरम्यान, पाकिस्तानने ५ पैकी ४ सामन्यात विजय मिळवल्यास देखील पाकिस्तानचा उपांत्य फेरी गाठण्याचा मार्ग खुला होऊ शकतो. कारण ४ सामने जिंकल्यानंतर पाकिस्तानचे गुण १२ होतील. मात्र, त्यासाठी पाकिस्तानला आपल्या नेटरनरेटमध्ये सुधारणा करावी लागेल.