Join us  

मुंबई इंडियन्सने रोहित शर्माकडून कर्णधारपद का काढून घेतलं? Inside Story आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2024 9:44 AM

Open in App
1 / 7

हार्दिकला कर्णधार का बनवलं, या निर्णयाबाबत आतापर्यंत मुंबई इंडियन्सकडून कोणतीच प्रतिक्रिया आली नव्हती, पण मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर यांनी अखेर यामागचं कारण सांगितलं.

2 / 7

मुंबई इंडियन्सला सर्वाधिक ५ जेतेपद जिंकून देणाऱ्या रोहित शर्माला आता हार्दिकच्या नेतृत्वाखाली खेळावे लागेल, हेच अनेकांच्या पचनी पडलेले नाही आणि अजूनही या निर्णयावर ते नाखूश आहेत. पण, रोहितचं वय ( ३७) पाहता हा निर्णय योग्य असल्याचेही अनेकांचे मत आहे. हार्दिकला कर्णधार का बनवलं, या निर्णयाबाबत आतापर्यंत मुंबई इंडियन्सकडून कोणतीच प्रतिक्रिया आली नव्हती, पण मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर यांनी अखेर यामागचं कारण सांगितलं.

3 / 7

मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचर यांनी प्रथमच याबद्दल खुलासा करताना हा 'क्रिकेट निर्णय' असल्याचे सांगितले. म्हणजेच, क्रिकेटचा विचार करून घेतलेला हा निर्णय असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ते म्हणाले, 'मला वाटते की हा निव्वळ क्रिकेटचा निर्णय होता. हार्दिकला एक खेळाडू म्हणून परत आणण्यासाठी आम्ही ट्रेड विंडोची वाट पाहिली. माझ्यासाठी हा एक संक्रमणाचा टप्पा आहे. भारतात बऱ्याच लोकांना हे समजत नाहीत, ते खूप भावूक होतात. पण, या निर्णयापासून भावना दूर करा. मला वाटते की एक खेळाडू म्हणून रोहित आता सर्वोत्कृष्ट कामगिरी करून दाखवेल,” असे मार्क बाऊचर यांनी स्मॅश स्पोर्ट्स पॉडकास्टवर सांगितले.

4 / 7

रोहितला कर्णधारपदाच्या भारापासून आणि ही हवा निर्माण केली जायची त्यापासून दूर करण्याचा विचार MI थिंक टँकचा होता, असे बाऊचर म्हणाले. रोहितने २०२२ मध्ये १२०.१८च्या स्ट्राइक रेटने २६८ धावा केल्या, जेव्हा संघ गुणतालिकेत तळाशी होता. २०२३ मध्ये त्याने १३२.८०च्या स्ट्राईक रेटने ३३२ धावा करून चांगली कामगिरी केली आणि संघ दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पराभूत झाला.

5 / 7

'रोहित हा एक विलक्षण माणूस आहे. म्हणजे तो अनेक वर्षांपासून कर्णधार आहे आणि त्याने मुंबई इंडियन्ससाठी खरोखरच चांगली कामगिरी केली आहे. आता तो भारतीय संघाचे नेतृत्वही करतो. त्याच्याभवती सतत कॅमेरांचा पहारा असतो आणि तो इतका व्यग्र आहे. या दडपणात त्याला फलंदाज म्हणून मागील दोन पर्वात चांगली कामगिरी करता आलेली नाही, परंतु कर्णधार म्हणून त्याने ती कामगिरी करून दाखवली आहे,''हेही बाऊचर यांनी मान्य केले.

6 / 7

'आणि मला असे वाटले की, जेव्हा आम्ही संपूर्ण मुंबई इंडियन्स कुटूंब म्हणून बोलतो तेव्हा आम्हाला वाटले की कदाचित रोहितला एक खेळाडू म्हणून पुन्हा दमदार पाऊल ठेवण्याची ही संधी आहे. त्यामुळे त्याच्या खेळाचा आनंद घ्यायला हवा,''असे ते म्हणाले. तो भारतीय संघाचा कर्णधार आहे आणि आयपीएलमध्ये जेव्हा कर्णधार म्हणून तो मैदानावर येतो, तेव्हा त्याच्यावर प्रचंड दडपण असते, त्यामुळे तो फलंदाज म्हणून त्याचं सर्वोत्तम देऊ शकत नाही, असेही बाऊचर यांनी नमूद केले.

7 / 7

बाऊचर यांनी रोहितचा उत्तराधिकारी हार्दिक पांड्याचे कौतुक केले. हार्दिकला गुजरात टायटन्सने २०२२2 हंगामापूर्वी लिलावापूर्वी आपल्या ताफ्यात घेतले. त्याच वर्षी त्याने नेतृत्वाचे कौशल्य दाखवून गुजरातला पहिल्याच हंगामात जेतेपद पटकावून दिले आणि २०२३ मध्ये ते उपविजेते ठरले. ''तो मुंबई इंडियन्सचा खेळाडू आहे. तो अन्य फ्रँचायझीकडे गेला आणि तेथे पहिल्याच प्रयत्नात जेतेपद जिंकून दिले. त्यामुळे त्याच्याकडे चांगले नेतृत्व कौशल्य आहे, हे मान्य करायला हवं,''असे बाऊचर म्हणाले.

टॅग्स :रोहित शर्मामुंबई इंडियन्सआयपीएल २०२३हार्दिक पांड्या