अश्विनला ऑस्ट्रेलियाचा संघ एवढा का घाबरतो? आकडे पाहून समजेल फिरकीची 'दहशत'

ऑस्ट्रेलियन बॅटिंगचा कणा असलेल्या स्मिथ-वॉर्नर जोडीसाठी अश्विन नेहमीच ठरलाय डोकेदुखी

R Ashwin records stats, IND vs AUS: ऑस्ट्रेलिया संघाने भारताविरुद्ध ९ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी तयारी सुरू केली आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (WTC 2023) अंतिम फेरीचे तिकीट चार कसोटी सामन्यांच्या मालिकेवर अवलंबून आहे. म्हणूनच दोन्हीही संघ कंबर कसून तयारीला लागले आहेत.

रविचंद्रन अश्विन सध्या ऑस्ट्रेलियासाठी सर्वात घातक गोलंदाज ठरण्याची भीती ऑस्ट्रेलियाला आहे. त्याचे कारण भारताच्या फिरकी ट्रॅकवर अश्विनचा सामना करणे खूपच कठीण आहे. याच निमित्ताने पाहूया, अश्विनची आकडेवारी-

रविचंद्रन अश्विन हा भारतासाठी कसोटी क्रिकेटमधील दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. त्याच्या नावावर आतापर्यंत 88 कसोटी सामन्यात 449 बळींची नोंद आहे. अश्विनने 30 वेळा एका डावात पाच विकेट्स घेतल्या आहेत. तर 7 वेळा त्याने एका सामन्यात 10 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत.

रविचंद्रन अश्विनने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 18 कसोटी सामने खेळले आहेत. या कसोटींमध्ये त्याने तब्बल 89 बळी टिपले आहेत. विशेष म्हणजे, अश्विनने त्याच्या कारकिर्दीत एका संघाविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेतलेला संघ हा ऑस्ट्रेलियाचाच संघ आहे.

ही मालिका भारतात होत आहे. घरच्या खेळपट्ट्यांवर रविचंद्रन अश्विनचे रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. त्याने आतापर्यंत 51 कसोटी सामन्यांमध्ये 312 विकेट घेतल्या आहेत. फक्त बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीबद्दल बोलायचे झाले, तर अश्विनने 18 सामन्यात 89 विकेट घेतल्या आहेत. यापैकी 50 विकेट भारतात झालेल्या कसोटी सामन्यातील आहेत.

अश्विनने त्याच्या कारकिर्दीत डेव्हिड वॉर्नरला १० वेळा आणि स्टीव्ह स्मिथला ६ वेळा बाद केले आहे. हे दोघेही यावेळी ऑस्ट्रेलियन संघाच्या फलंदाजीचा कणा मानले जात आहेत, त्यामुळेच भारताची मुख्यतः रविचंद्रन अश्विनवर भिस्त आहे.