T20 World Cup 2026: कोण ठरणार प्लेअर ऑफ द टूर्नामेंट? ८ खेळाडूंमध्ये तगडी फाईट; यादीत एकमेव भारतीय!

T20 World Cup 2026: २०२६ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेचा थरार आता आपल्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. ८ मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या महामुकाबल्यापूर्वी, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने शुक्रवारी (६ मार्च २०२६) स्पर्धेतील प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी ८ नामांकित खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.

विल जॅक्स (इंग्लंड): इंग्लंडच्या या अष्टपैलू खेळाडूने २२६ धावा आणि ९ विकेट्स घेत अष्टपैलू छाप पाडली. सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करत सर्वाधिक धावा करण्याचा मिसबाह-उल-हकचा विक्रमही त्याने मोडला.

लुंगी एनगिडी (दक्षिण आफ्रिका): आपल्या भेदक स्लो चेंडूंनी एनगिडीने फलंदाजांना नाचवले. त्याने ७ सामन्यात १२ विकेट्स घेतले असून भारताविरुद्ध अवघ्या १५ धावा देत त्याने आपली ताकद दाखवून दिली.

एडन मार्कराम (दक्षिण आफ्रिका): कर्णधाराला साजेसा खेळ करत मार्करामने ८ डावांत २८६ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेला अंतिम फेरीत नेण्यात त्याचा मोठा वाटा आहे.

रचिन रवींद्र (न्यूझीलंड): किव्ही अष्टपैलूने ११ विकेट्स आणि १२८ धावांसह आपली उपयुक्तता सिद्ध केली. फिरकी गोलंदाजीने त्याने श्रीलंकेला १०७ धावांत रोखण्यात मदत केली.

शॅडली व्हॅन शाल्कविक (यूएसए): स्पर्धेतील सर्वात मोठे सरप्राईज ठरलेल्या शाल्कविकने अवघ्या ४ सामन्यात १३ विकेट्स घेतल्या. त्याने भारत आणि पाकिस्तानविरुद्ध प्रत्येकी ४ बळी घेत खळबळ उडवून दिली.

टीम सेफर्ट (न्यूझीलंड): या स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करत सेफर्टने ७ डावांत २७४ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उपांत्य सामन्यातील त्याचे अर्धशतक अत्यंत महत्त्वाचे ठरले.

साहिबजादा फरहान (पाकिस्तान): पाकिस्तानच्या या सलामीवीराने विराट कोहलीचा विक्रम मोडीत काढत एकाच विश्वचषकात सर्वाधिक ३८३ धावा कुटल्या आहेत. यात दोन धडाकेबाज शतकांचा समावेश आहे.

संजू सॅमसन (भारत): स्पर्धेत उशिरा संधी मिळूनही संजू सॅमसनने आपल्या बॅटने सर्वांना थक्क केले आहे. बाद फेरीच्या (Knockout) सामन्यांमध्ये त्याने केलेली कामगिरी निर्णायक ठरली. त्याने ४ डावांत ७७.३३ च्या सरासरीने २३२ धावा केल्या आहेत.