Andre Russell vs Shahbaz Ahmed, IPL 2022 KKR vs RCB: आधी रसल त्याला 'नडला', मग त्याने रसलला 'तोडला'... एकाच मॅचमध्ये हिशेब चुकता करणारा शाहबाज नक्की कोण?

रसलचा बदला घेत RCBच्या विजयात बजावली महत्त्वाची भूमिका

Andre Russell vs Shahbaz Ahmed, IPL 2022: कोलकाता नाइट रायडर्स (KKR) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) यांच्या सामन्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा अष्टपैलू शाहबाज अहमदने आपल्या फलंदाजीने अनेकांचं लक्ष वेधलं.

हरयाणाच्या शाहबाजने अहमदने एकाच सामन्यात कोलकाताचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसलविरुद्धचा हिशेब चुकता केला. शाहबाजला गोलंदाजीत फारसा प्रभाव पाडता आला नाही, पण त्याने फलंदाजीत चमक दाखवली आणि रसलचा बदला पूर्ण केला.

डावखुरा फिरकी गोलंदाज शाहबाज अहमदने कोलकाताविरुद्ध फक्त एकच षटक टाकले. या षटकात कोलकाताचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसलने त्याला २ षटकार मारत १६ धावा काढल्या. त्यानंतर त्याला पुन्हा गोलंदाजी देण्यात आली नाही. पण फलंदाजी करताना शाहबाज अहमदने हिशेब चुकता केला.

शाहबाजने आंद्रे रसलच्या एकाच षटकात त्याला दोन षटकार मारून बदला घेतला. शाहबाजने कोलकात्याविरुद्ध २० चेंडूत ३ षटकारांच्या मदतीने २७ धावा केल्या. त्याच्या याच खेळीच्या जोरावर सामना RCBच्या दिशेने झुकला आणि सामन्यात विजय मिळवणं सोपं गेलं.

२.४० कोटींना RCBने घेतलेला शाहबाज अहमद देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगालकडून खेळतो. इंडियन प्रीमियर लीगपूर्वी शाहबाज अहमदने रणजी ट्रॉफीमध्ये बंगालसाठी जबरदस्त खेळ केला होता. त्याने आपल्या उत्कृष्ट फलंदाजीसोबतच गोलंदाजीनेही देशांतर्गत क्रिकेटमध्ये नाव कमावले.

शाहबाज अहमदने आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत आतापर्यंत १६ सामन्यांत ७७९ धावा आणि ४५ बळी घेतले आहेत. लिस्ट-ए आणि टी२० क्रिकेटमध्येही शाहबाजची कामगिरी उत्कृष्ट आहे.

शाहबाज अहमदने २६ लिस्ट-ए सामन्यांमध्ये ६६२ धावा आणि २४ बळी घेतले आहेत. त्याचबरोबर टी२० क्रिकेटमध्ये ४२ सामन्यांत ३५ विकेट आणि ३२० धावा केल्या आहेत. शाहबाजने रणजी ट्रॉफीमध्येही हॅट्ट्रिक घेतली आहे.

शाहबाज गेल्या ३ वर्षांपासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा भाग आहे. आरसीबीने त्याचा IPL 2020 च्या लिलावात समावेश केला होता. त्यानंतर त्याला त्याच मोसमात राजस्थान रॉयल्सविरुद्ध पदार्पण करण्याची संधी मिळाली.

डावखुऱ्या शाहबाज अहमदने आतापर्यंत १५ IPL सामने खेळले आहेत. त्यात ८७ धावा केल्या असून ९ बळी टिपले आहेत. भारतीय अष्टपैलू खेळाडू आणि चेन्नई सुपर किंग्जचा सध्याचा कर्णधार रवींद्र जाडेजाला शाहबाज आपला आदर्श मानतो.