Sanju Samson: "तुम्ही संजू सॅमसनला काय उत्तर देणार आहात?, भारताच्या माजी खेळाडूने निवडकर्त्यांवर साधला निशाणा

भारतीय संघ ४ डिसेंबरपासून बांगलादेशविरूद्ध वनडे मालिका खेळणार आहे.

भारतीय संघ सध्या न्यूझीलंडविरूद्ध वनडे मालिका खेळत आहे. ही मालिका संपल्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ बांगलादेशविरूद्ध वनडे आणि कसोटी मालिका खेळेल. खरं तर सध्या शिखर धवनच्या नेतृत्वात भारत न्यूझीलंडविरूद्ध वनडे मालिका खेळत आहे, ज्याचा अखेरचा सामना उद्या होणार आहे. मात्र या मालिकेत यजमान संघ १-० ने आघाडीवर आहे.

न्यूझीलंडविरूद्धच्या वनडे मालिकेसाठी अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. यामधीलच एक नाव म्हणजे संजू सॅमसन. सॅमसनने मालिकेतील पहिला सामना खेळला मात्र दुसऱ्या सामन्यात त्याला संधी मिळाली नाही. एक अतिरिक्त गोलंदाज असावा म्हणून आम्ही संजू सॅमसनला दुसऱ्या सामन्यात खेळवले नाही असे कर्णधार शिखर धवनने सांगितले होते. मात्र आगामी बांगलादेश दौऱ्यासाठी देखील सॅमसनला संधी न मिळाल्याने क्रिकेट वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

अशातच भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि समालोचक आकाश चोप्रा याने भारताच्या संघ निवड समितीवर विविध प्रश्न उपस्थित केले आहेत. ४ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या आगामी बांगलादेश मालिकेसाठी निवडकर्त्यांनी संजू सॅमसनकडे दुर्लक्ष केल्याने माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने नाराजी व्यक्त केली आहे. २०१५ मध्ये पदार्पण करणाऱ्या सॅमसनला फार कमी काळ भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली आहे.

आकाश चोप्राने म्हटले, "सध्या सुरू असलेली मालिका संपल्यावर आठ-नऊ खेळाडू मायदेशी जातील. उरलेले बांगलादेशला जातील. तुम्ही एका मालिकेतून दुसऱ्या मालिकेत १२ खेळाडू बदलले आहेत. ११ नवीन खेळाडू बांगलादेशविरूद्धच्या वनडे मालिकेसाठी सामील होत आहेत. यावर काही करता येईल का? असे का घडते", आकाश चोप्राने त्याच्या यूट्यूब चॅनेलवरून हा प्रश्न उपस्थित केला.

"तुम्हाला जर खरंच एखाद्याला विश्रांती द्यायची असेल तर तो SKY आहे. तो खूप क्रिकेट खेळतोय. पण संजू सॅमसनचं काय? तोही बांगलादेशला जात नाही आहे. ईशान किशन जाईल. किशन जो फक्त टी-२० साठी तिथे होता. न्यूझीलंड दौऱ्याचा भाग होता पण तो वनडे संघाचा भाग नव्हता मात्र संजू सॅमसन होता", असे आकाश चोप्राने म्हटले.

"जेव्हा तुम्ही वनडे संघात इतके बदल पाहता तेव्हा असे वाटते की याचा अर्थ काय आहे? शुबमन गिल, संजू सॅमसन आणि दीपक हुडा यांना तुम्ही काय उत्तर देणार आहात? जर तुम्हाला कुलदीप आणि चहलला एकत्र खेळवायचे नसेल तर तुम्ही त्यांना का निवडता? जर तुम्ही त्यांना निवडत असाल तर खेळवा", अशा शब्दांत आकाश चोप्राने निवड समितीचा चांगलाच समाचार घेतला.

खरं तर ऋषभ पंतसह यष्टिरक्षकांपैकी एक म्हणून निवडलेल्या सॅमसनला न्यूझीलंडच्या संपूर्ण ट्वेंटी-२० मालिकेत बाकावरच बसावे लागले. पहिल्या वनडे सामन्यात त्याला खेळायला मिळाले आणि त्याने ३८ चेंडूत ३६ धावा केल्या तरीही मधल्या फळीतील फलंदाजाला पुन्हा एकदा दुसऱ्या सामन्यासाठी बाकावर बसावे लागले होते. त्यामुळे उद्याच्या सामन्यात त्याला संधी मिळणार का हे पाहण्याजोगे असेल.

बांगलादेशविरूद्धच्या वनडे मालिकेसाठी संघ - रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत, ईशान किशन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चहर, यश दयाल.

बांगलादेशविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघ - रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव.