क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत झालेल्या सामन्यांपैकी सर्वात रंगतदार ठरलेल्या लढतीत न्यूझीलंडवर मात करत गतवर्षी इंग्लंडने क्रिकेट विश्वचषकावर नाव कोरले होते. या अंतिम लढतील अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स हा इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला होता.
दरम्यान, विश्वचषकातील अंतिम लढतीमध्ये सुपर ओव्हरपूर्वी बेन स्टोक्सने तणावमुक्त होण्यासाठी केलेल्या कृत्याबद्दल आता एका पुस्तकामधून गौप्यस्फोट झाला आहे.
विश्वचषकातील या अंतिम लढतीत मुख्य सामना आणि सुपर ओव्हर बरोबरीत सुटले होते. त्यामुळे अखेरीस इंग्लंडला वादग्रस्त बाऊंड्री काऊंट नियमाचा आधार घेऊन विजेते घोषित करण्यात आले होते.
दरम्यान, इंग्लंडच्या या विजयाला एक वर्ष पूर्ण झाल्याप्रित्यर्थ ‘मॉर्गन मेन: द इनसाइड स्टोरी ऑफ इंग्लंड राइज ऑफ क्रिकेट वर्ल्ड कप ह्युमिलिएशन टू ग्लोरी’ पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. या पुस्तकामधून इंग्लंडच्या विश्वविजेत्या संघाबाबत अनेक गौप्यस्फोट करण्यात आले आहेत. या पुस्तकातूनच अंतिम सामन्याच्या दिवशी बेन स्टोक्स दबावात असल्याचा दावा करण्यात आला आहे.
निक हॉल्ट आणि स्टीव्ह जेम्स यांनी लिहिलेल्या या पुस्तकातील काही भाग स्टफ. सीओ. एनझेड मध्ये प्रकाशित झाला आहे. त्यात बेन स्टोक्सने अंतिम सामन्यातील सुपर ओव्हरपूर्वी स्वत:वरील दबाव कमी करण्यासाठी सिगारेट ब्रेक घेतल्याचा दावा करण्यात आला आहे.
सुपर ओव्हरपूर्वी २७ हजार प्रेक्षकांनी भरलेल्या स्टेडियममध्ये आणि सगळीकडे कॅमेऱ्यांची बारीक नजर असल्याने एकांत शोधणे कठीण होते. मात्र लॉर्ड्सवर अनेकदा खेळलेला असल्याने स्टोक्सला येथील कोपऱ्यान कोपरा माहिती होता.
त्यामुळेच जेव्हा इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गन ड्रेसिंग रूममध्ये तणाव कमी करण्याचा आणि पुढील रणनीती ठरवण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा स्टोक्सने शांतता मिळवण्यासाठी काही वेळ काढला.
पुस्तकातील उल्लेखाप्रमाणे त्यावेळी बेन स्टोक्स धूळ आणि घामाने भिजलेला होता. अत्यंत कठीण आणि तणावपूर्ण परिस्थितीत दोन तास २७ मिनिटे फलंदाजी करून त्याने संघाला सामन्यात कमबॅक करून दिले होते.
दरम्यान, सामना टाय होऊन दोन्ही संघ सुपर ओव्हरच्या तयारीस लागल्यावर बेन स्टोक्स काही काळासाठी इंग्लंडच्या ड्रेसिंग रूममध्ये गेला. तिथून तो बाथरूममध्ये शॉवर घेण्यासाठी गेला. तिथे सिगारेट पेटवली आणि काही काळ शांततेत घालवला, असे या पुस्तकात म्हटले आहे.
इंग्लिश संघाला पहिल्यांदाच विश्वचषकासमिप पोहोचवणारी खेळी खेळणाऱ्या बेन स्टोक्सला नाबाद ८४ धावांच्या खेळीसाठी अंतिम सामन्यातील सामनावीराचा मान मिळाला. विशेष बाब म्हणजे सिगारेट ब्रेक घेतल्यानंतर सुपर ओव्हरमध्येही स्टोक्सने ८ धावा फटकावल्या होत्या.