Ravindra Jadeja: "आम्हाला अक्षर पटेलची गरज आहे, तू निवृत्त हो", रवींद्र जडेजाचं एक ट्विट अन् झाला ट्रोल

ravindra jadeja troll: अनुभवी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात स्थान मिळाले आहे.

रवींद्र जडेजा मागील मोठ्या कालावधीपासून भारतीय संघातून बाहेर आहे. त्याने अलीकडेच त्याच्या ट्विटर अकाउंटवरून कसोटी क्रिकेटमधील जर्सीचा फोटो शेअर करत म्हटले की, "आठवण येते, पण लवकरच", जडेजाला याच ट्विटवरून आता ट्रोल केले जात आहे.

रवींद्र जडेजाच्या गैरहजेरीत भारतीय संघात अक्षर पटेलचा समावेश करण्यात आला. अक्षरने मिळालेल्या संधीचे सोने करत शानदार खेळी करून सर्वांच्या मनात जागा केली. अक्षरची चमकदार कामगिरी पाहून चाहते म्हणतायत की, त्यांना आता जडेजाची उणीव भासत नाही.

डॉ. निमो यादव नावाच्या युजरने लिहिले की, "आम्हाला अक्षरची गरज आहे. तू निवृत्त व्हो." मागील वर्षी आशिया चषकादरम्यान जडेजाला दुखापत झाली होती. तेव्हापासून तो भारतीय संघातून बाहेर आहे.

तर रॉनक नावाच्या युजरने म्हटले की, "यामध्ये काहीच शंका नाही की तू एक दिग्गज अष्टपैलू आहेस. मात्र, अक्षर पटेल सध्या शानदार लयमध्ये आहे. मला आशा आहे की अक्षरला संघातून वगळले जाणार नाही."

रवींद्र जडेजाच्या उजव्या पायाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सध्या तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये उपचार घेत आहे. जडेजाचे क्रिकेटमधील पुनरागमन त्याच्या फिटनेसवर अवलंबून असेल. अशा परिस्थितीत तो रणजी ट्रॉफीमध्ये खेळताना दिसण्याची शक्यता आहे.

क्रिकइन्फो या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र जडेजा सौराष्ट्रकडून तामिळनाडूविरुद्ध रणजी सामने खेळताना पाहायला मिळू शकतो. हा सामना 24 जानेवारीपासून चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

रवींद्र जडेजाने एनसीएमध्ये फिटनेस सिद्ध केल्यानंतरच त्याच्या निवडीचा विचार केला जाईल, असे भारतीय निवड समितीने स्पष्ट केले आहे.

रवींद्र जडेजा भारतीय संघाचा प्रमुख अष्टपैलू पर्याय आहे. तो एक उत्कृष्ट फिरकी गोलंदाजही आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत तो भारतासाठी महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेतील पहिला कसोटी सामना 9 फेब्रुवारीपासून नागपुरात खेळवला जाणार आहे.

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, ईशान किशन, आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.

भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ - पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार, ॲश्टन आगर, स्कॉट बोलंड, ॲलेक्स कॅरी, डेव्हिड वॉर्नर, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवुड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वीपसन.