विराट कोहली आणि रोहित शर्मा या भारतीय क्रिकेट संघातील धडाकेबाज फलंदाजांनी नुकत्याच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत जबरदस्त कामगिरी केली होती. तसेच त्यांच्या सातत्यपूर्ण फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने ही मालिका २-१ अशा फरकाने जिंकली होती. मात्र आता रोहित शर्मा आणि विराट कोहलीला बीसीसीआय मोठा धक्का देण्याची शक्यता आहे.
बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या मध्यवर्ती करारांबाबत मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. भारताच्या एकदिवसीय आणि कसोटी संघांचा कर्णधार शुभमन गिलला A+ श्रेणीमध्ये प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तर आतापर्यंत A+ श्रेणीत असलेल्या विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना डिमोशन मिळण्याची शक्यता आहे.
बीसीसीआयची ही बैठक २२ डिसेंबर होण्याची शक्यता आहे. या बैठकीमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधील A+ श्रेणीत ठेवायचं की नाही, याचा निर्णय होणार आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा हे सध्या केवळ भारताच्या एकदिवसीय संघामधून खेळतात. त्यांनी यावर्षी झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान, दोघांनीही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली होती. तर २०२४ झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर रोहित आणि विराट टी-२० क्रिकेटमधून निवृत्त झाले होते.
टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली असली तरी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केलेली आहे. तसेच आयसीसीच्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत रोहित शर्मा पहिल्या आणि विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
दरम्यान, बीसीसीआयच्या मध्यवर्ती करारामध्ये केवळ चार खेळाडूंना A+ श्रेणीमध्ये स्थान देण्यात आलं होतं. रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा या ४ खेळाडूंचा त्यात समावेश होता. A+ श्रेणीतील खेळाडूंना मध्यवर्ती करारानुसार वार्षिक ७ कोटी रुपये मानधन मिळतं.
सध्या बीसीसीआयने मध्यवर्ती करारामध्ये समावेश होणाऱ्या खेळाडूंची ४ श्रेणींमध्ये विभागणी केलेली आहे. त्यामध्ये A+ श्रेणीतील खेळाडूंना मध्यवर्ती करारानुसार वार्षिक ७ कोटी रुपये मानधन मिळतं. तर A श्रेणीतील खेळाडूंना वार्षिक ५ कोटी रुपये एवढं मानधन मिळतं. श्रेणीमधील खेळाडूंना ३ कोटी रुपये एवढं वार्षिक मानधन मिळतं. तर C श्रेणीमधील खेळाडूंना १ कोटी रुपये वाऱ्षिक मानधम मिळतं.
दरम्यान, मध्यवर्ती करारासाठी बीसीसीआयने काही नियम निश्चित केले आहेत. त्यानुसार एका हंगामात किमान ३ कसोटी किंवा ८ एकदिवसीय किंवा १० टी-२० सामने खेळणाऱ्या खेळाडूंशी मध्यवर्ती करार केला जातो.