विनोद कांबळीची सुरुवात यापेक्षा चांगली झालेली...! कपिल देव यांचे शुबमन गिलबाबत मोठे भाष्य

IPL 2023 : २३ वर्षीय शुबमन गिलची तुलना आता महान खेळाडूंसोबत होऊ लागली असताना भारताचे वर्ल्ड कप विजेते कर्णधार कपिल देव ( Kapil Dev) यांचे मत काही वेगळे आहे

शुबमन गिल ( Shubman Gill) च्या कामगिरीसमोर सध्या जग ठेंगणे वाटू लागले आहे. सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, रोहित शर्मा, इयान बिशॉप... हे जगातील महान फलंदाजांकडे शुबमनचे कौतुक करण्यासाठी शब्द अपूरे पडू लागले आहेत.

इंडियन प्रीमिअर लीग २०२३ चा हंगाम गुजरात टायटन्सच्या या सलामीवीराने गाजवला आहे. त्याने १६ सामन्यांत ३ शतकांसह ८५१ धावा चोपल्या आहेत. विराट कोहली आणि जॉस बटलर यांच्यानंतर एका हंगामात तीन शतकं झळकावणारा आणि ८००+ धावा करणारा तो तिसरा फलंदाज आहे. आयपीएलच नव्हे तर शुबमनने मागील ६ महिन्यांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटही गाजवून सोडले आहे. .

शुबमन गिलच्या स्ट्रोकप्लेने सर्व खूप प्रभावित झाले असले तरी, कपिल देव त्याला सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीच्या पंगतीत ठेवू इच्छित नाहीत. भारताचे १९८३ च्या वर्ल्ड कप विजेते कर्णधार म्हणाले की, ''गुजरात टायटन्सच्या सलामीवीराला महान समजण्यासाठी असे आणखी दोन सत्रे घेण्याची गरज आहे. सुनील गावस्कर आला, सचिन तेंडुलकर आला, त्यानंतर राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण, वीरेंद्र सेहवाग, विराट कोहली आणि आता तो ज्या प्रकारची फलंदाजी करत आहे, त्यावरून शुभमन गिल त्यांच्या पावलावर पाऊल टाकत असल्याचे दिसून येते. पण मला त्याला आणखी एक सीझन द्यायला आवडेल. त्याच्याकडे नक्कीच प्रतिभा आहे पण आता त्याची तुलना महान खेळाडूंसोबत करायला आवडणार नाही.''

"गावस्कर, सचिन आणि कोहली यांच्यानंतर तो पुढचा स्टार आहे, असे म्हणण्याआधी त्याला आणखी एक दोन पर्व असे खेळायला हवे. गोलंदाजांना एक किंवा दोन चांगल्या हंगामानंतर तुमची ताकद आणि कमकुवतता कळते. पण जर तुमच्याकडे तीन किंवा चार चांगले हंगाम असतील. त्यानंतर आपण म्हणू शकतो की तो खरोखर महान आहे,” असे कपिल यांनी एबीपी न्यूजला सांगितले.

गिलने क्वालिफायर २ सामन्यातं मुंबई इंडियन्सविरुद्ध ६० चेंडूंत १२९ धावांची खेळी केली आणि गुजरातला ६२ धावांनी विजय मिळवून दिला. कपिल यांनी विनोद कांबळीचे उदाहरण दिले आणि सांगितले की गिलची खरी परीक्षा जेव्हा त्याचा पर्पल पॅच संपेल तेव्हा होईल. दिग्गज अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांनी सांगितले की, हा सलामीवीर कसा प्रतिक्रिया देतो आणि स्वतःला कसे हाताळतो हे पहायचे आहे. जेव्हा त्याच्या धावा सर्वोच्च स्तरावर आटतात आणि गोलंदाज त्याच्यावर कुठे गोलंदाजी करायची हे ठरवतात, तेव्हा त्याची परीक्षा असेल.

"शुबमन गिलसाठी हा पर्पल पॅच आहे. तो किती काळ असाच खेळतो हे पाहावे लागेल. इतक्या धावा केल्यावर तो कसा पुनरागमन करतो, हे पाहणे मनोरंजक असेल. सूर्यकुमार यादवकडे पाहा. शानदार हंगामानंतर तो तीनवेळा गोल्डन डकवर बाद झाला आणि नंतर तो पुन्हा जोरदारपणे परतला. तुम्ही या खेळाडूंना खूप रेट करता. त्यामुळे गिलचा पर्पल पॅच पूर्ण झाल्यावर तो कसा परततो हे पाहण्यासाठी मी उत्सुक असेन. त्याच्याकडे सर्व गुण आहेत ही त्याची सर्वात मोठी ताकद आहे. चौकार येत नसतानाही तो घाई करत नाही. त्याच्याकडे सर्व शॉट्स आहेत,''असेही ते म्हणाले.

"मला चुकीचे समजू नका, मला त्याच्या क्षमतेवर शंका नाही. पण तुलना न करता, मला एका क्रिकेटपटूबद्दल बोलायचे आहे, विनोद कांबळी, ज्याने कदाचित त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची आणखी चांगली सुरुवात केली होती. त्यामुळे सर्वात मोठा प्रश्न. गिलसमोर आता हे असेल की तो स्वत:ला हाताळू शकेल का? या तरुण वयात त्याला मिळणारे सर्व लक्ष आणि प्रसिद्धी याला सामोरे जावे लागेल?" कपिल म्हणाले.