Join us

Vinod Kambli: कधीकाळी लाखो कमावणारा कांबळी आता पेन्शनवर जगतोय; अशी झालीये त्याची अवस्था...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 18:31 IST

Open in App
1 / 8

Vinod Kambli Financial Condition: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसोबत भारतीय क्रिकेट संघात पदार्पण करणारा फलंदाज विनोद कांबळी सध्या हलाखीचे जीवन जगत आहे. बीसीसीआयकडून मिळणारी पेन्शन, ही त्याचे घर चालवण्याचे एकमेक साधन राहिली आहे. मुंबईसारख्या ठिकाणी इतक्या कमी पैशात घर चालवणे, त्याच्यासाठी फार कठीण झाले आहे. मैदानावर गोलंदाजांना सळो की पळो करणारा कांबळी एकेकाळी लाखो रुपये कमावायचा, पण आज त्याच्याकडे घर चालण्यापूरतेही पैसे उरले नाहीत.

2 / 8

18 जानेवारी 1972 रोजी मुंबईत जन्मलेल्या विनोद कांबळीला रमाकांत आचरेकर यांनी मास्टर ब्लास्टरपेक्षा अधिक प्रतिभावान मानले होते. पण, नंतरच्या काळात सचिनने मोठे यश मिळवले आणि कांबळी आकाशातून धाडकन जमिनीवर आपटला, हा नशिबाचा खेळच म्हणावा लागेल. सध्या कांबळीला बीसीसीआयकडून मासिक 30,000 रुपयांची पेन्शन मिळते, त्यावरच तो आपले जीवन जगत आहे.

3 / 8

मीडिया रिपोर्ट्सनुसार, माजी भारतीय क्रिकेटर विनोद कांबळी यांची एकूण संपत्ती 1 ते 1.5 दशलक्ष डॉलर्सच्या दरम्यान आहे. पण, 2022 च्या सुरुवातीला आलेल्या आकडेवारीनुसार, त्याचे वार्षिक उत्पन्न केवळ 4 लाख रुपये राहिले आहे. मुंबईत त्याचे स्वतःचे घर आहे, पण देशाच्या आर्थिक राजधानीत राहण्यासाठी पेन्शन अपुरी पडत आहे.

4 / 8

क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतरही त्याच्याकडे काही काळ कमाईची अनेक साधने होती. त्याने काही काळ क्रिकेट सामन्यांमध्ये कॉमेंट्री केली, जाहिरातींमध्ये काम केले. यामुळे त्याला भरपूर पैसे मिळत राहिले. इतकंच नाही तर चित्रपटांमध्ये अभिनय करत कमाई केली. पण कालांतराने त्याची कमाई संपली आणि अखेर कोरोना महामारी (कोविड-19) पासून त्याची आर्थिक परिस्थिती सातत्याने खालावत चालली आहे.

5 / 8

कमाईचे सर्व साधन बंद झाल्याने आता कांबळीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नुकत्याच विनोद कांबळीने त्याच्या सर्व समस्या आणि आयुष्यातील अडचणी लोकांसमोर मांडल्या आहेत. कांबळीने असेही सांगितले की, त्याचा माजी सहकारी आणि मित्र सचिन तेंडुलकरला त्याच्या स्थितीची जाणीव आहे, परंतु सचिनने त्याला खूप मदत केली असल्याने तो आता त्याच्याकडून कोणतीही आशा बाळगत नाही.

6 / 8

कांबळीने 2019 मध्ये अखेरचे संघाचे प्रशिक्षकपद भूषवले होते. तो T-20 मुंबई लीगमध्ये सहभागी होता. त्यानंतर 2020 मध्ये कोरोना व्हायरसने देशात आणि जगात थैमान घातले. तेव्हापासून इतर देशवासीयांसाठीच नाही तर कांबळीसाठीही परिस्थिती बदलली आहे. या साथीच्या प्रादुर्भावाने कांबळीकडे राहिलेले कमाईचे साधनही नष्ट झाले.

7 / 8

विनोद कांबळीने मिड डेला त्याच्या आर्थिक परिस्थितीची संपूर्ण माहिती दिली आहे. त्याने सांगितले की, तो दररोज पहाटे 4 वाजता उठायचा, डीवाय पाटील स्टेडियमपर्यंत कॅबने जायचा. त्यानंतर संध्याकाळी बीकेसी ग्राऊंडवर शिकवायचा. पण, सध्या परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. तो सध्या बीसीसीआयकडून मिळणाऱ्या पेन्शनवर आयुष्य काढत आहे. त्याने सांगितले की, तो मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्येही काम मागण्यासाठी गेला होता.

8 / 8

टीम इंडियासाठी विनोद कांबळीने एकूण 104 एकदिवसीय सामने आणि 17 कसोटी सामने खेळले आहेत. त्याने भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 3,561 धावा केल्या, ज्यात कसोटीमध्ये चार शतके आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये दोन शतके आहेत. कांबळीने 1991 मध्ये भारतासाठी वनडे पदार्पण केले होते, तर 2000 मध्ये त्याने शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता.

टॅग्स :विनोद कांबळीसचिन तेंडुलकरऑफ द फिल्ड
Open in App