Vinod Kambli Arrested : विनोद कांबळी, बेन स्टोक्सपासून ते श्रीसंतपर्यंत... 'या' क्रिकेटपटूंना पोलिसांनी केली होती अटक; पाहा काय होते आरोप

विनोद कांबळीला 'ड्रंक अँड ड्राईव्ह' प्रकरणात झाली होती अटक. पाहा कोणत्या खेळाडूवर काय होते आरोप.. वाचा सविस्तर

Vinod Kambli Arrested : Sachin Tendulkar चा जवळचा मित्र आणि भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला वांद्रे पोलिसांनी ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात अटक केली. याआधी काही क्रिकेटपटूंना तुरूंगाची हवा खावी लागली आहे. कोणत्या खेळाडूवर काय होते आरोप, वाचा सविस्तर

विनोद कांबळी - याला याआधीही तुरुंगाची हवा खावी लागली होती. २०१५ मध्ये त्याच्यासोबत त्याची पत्नी एंड्रिया हेविट हिच्यावर मोलकरणीने आरोप केले होते. दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 'कांबळी तापट स्वभावाचा आहे. त्याच्या पत्नीने व त्याने मोलकरणीला तीन दिवस खोलीत कोंडून ठेवलं होतं', असा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता.

रुबेल हुसेन (Rubel Hossain) - बांगलादेशचा वेगवान गोलंदाज रुबेल हुसेनवर अभिनेत्री नाजनीन अख्तरने बलात्काराचा आरोप केला होता. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. तीन दिवस कोठडीत राहिल्यानंतर २०१५च्या विश्वचषकात सहभागी होण्यासाठी त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. रुबेलने बांगलादेशला इंग्लंडविरुद्ध शानदार विजय मिळवून दिला. या कारणास्तव नाजनीनने त्याच्यावरील आरोप मागे घेतले होते.

ल्यूक पॉमर्सबॅच (Luke Pomersbach) - या ऑस्ट्रेलियन फलंदाजाला ९ ऑगस्ट २००९ रोजी दारू पिऊन गाडी चालवल्याबद्दल अटक करण्यात आली होती. दारू पिऊन त्याने एका अधिकाऱ्यावर हल्ला केला. त्यानंतर तो कायदेशीर कोठडीतून पळून गेला. नंतर त्याने आपला गुन्हा कबूल केला. त्यानंतर मे २०१२ साली पॉमर्सबॅचवर एका भारतीय हॉटेलमध्ये एका महिलेचा विनयभंग केल्याचाही आरोप होता. ल्यूकने त्या महिलेच्या होणाऱ्या नवऱ्यावरही हल्ला केल्याचं तक्रारीत म्हटलं होतं. या कारणावरून त्याला अटक करण्यात आली होती. नंतर प्रकरण न्यायालयाबाहेर निकाली निघाल्याने त्याच्यावरील सर्व आरोप वगळण्यात आले.

बेन स्टोक्स (Ben Stokes) : इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सही वादात सापडला होता. २०१७ मध्ये त्याला नाईट क्लबबाहेर मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर स्टोक्सला एक रात्र तुरुंगात काढावी लागली. यापूर्वी २०१२ मध्ये स्टोक्सला अशाच एका घटनेत अटक करण्यात आली होती.

श्रीसंत (S Sreesanth) - IPL 2013 मध्ये राजस्थान रॉयल्सच्या तीन खेळाडूंवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप होता. अजित चंडिला आणि अंकित चव्हाण यांच्यासह श्रीशांतलाही पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीशांतला अटक झाली तेव्हा तो दारूच्या नशेत होता. श्रीसंतवर आजीवन क्रिकेट बंदी घालण्यात आली होती. पण सात वर्षांनी तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये परतला.