Venkatesh Iyer: "मला तिथं जायचं होतं पण ते माझ्या हातात नाही", विश्वचषकात संधी न मिळाल्याने अय्यरने व्यक्त केली नाराजी

भारतीय संघाचा युवा खेळाडू व्यंकटेश अय्यरने भारताच्या विश्वचषकाच्या संघात स्थान न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली आहे.

भारतीय संघ सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. तिथे झालेल्या टी-20 मालिकेत हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील संघाने 1-0 ने मालिकेवर कब्जा केला. भारतीय संघाचा युवा खेळाडू अष्टपैलू व्यंकटेश अय्यरने आयपीएल 2021 मध्ये चमकदार कामगिरी करून भारतीय संघात स्थान मिळवले होते. मात्र त्याला काही खास काम कामगिरी करता आली नाही. 9 टी-20 सामन्यांमध्ये 133 धावा करण्यासोबतच अय्यरच्या नावावर 5 बळींची नोंद आहे.

व्यंकटेश अय्यरने साजेशी खेळी करून देखील त्याला भारतीय संघातून बाहेर व्हावे लागले. दुसरीकडे, भारतीय संघामध्ये पुनरागमन करण्याची आशा असलेल्या अय्यरने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2022 मध्ये मध्यप्रदेशसाठी चमकदार कामगिरी केली. पहिल्याच सामन्यात अय्यरने 62 धावांची शानदार खेळी खेळली आणि 20 धावा देऊन सहा बळी देखील पटकावले.

यानंतर झालेल्या पुढच्या सामन्यात देखील अय्यरने एक अर्धशतक झळकावले, परंतु त्यानंतर तो आणखी काही खास कामगिरी करू शकला नाही, दुखापतीमुळे तो संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला. खरं तर आयपीएलमध्ये केकेआरच्या संघाचा हा सलामीवीर फलंदाज सध्या NCA बंगळुरू येथे दुखापतीवर उपचार घेत आहे.

अशातच अय्यरने दुखापतीवर भाष्य करताना टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली आहे. क्रिकेटनेक्स्ट डॉट कॉमशी बोलताना व्यंकटेश अय्यरने एक मोठे विधान केले आहे. आपल्या दुखापतीबाबत बोलताना अय्यर म्हणाला, "मी शिडीवरून घसरलो आणि त्यामुळे मला दुखापत झाली आणि मी संपूर्ण स्पर्धेतूनच बाहेर पडलो."

"माझी प्रकृती खराब होती पण शस्त्रक्रिया चांगली झाली आणि ती ठीकच असावी. रिहॅबची प्रक्रिया व्यवस्थित चालू आहे आणि मी हळू हळू पुन्हा चालायला सुरुवात केली आहे. आशा आहे की काही महिन्यांत सगळं ठीक होईल." अशा शब्दांत अय्यरने आपल्या दुखापतीवर भाष्य केले.

दुसरीकडे, टी-20 विश्वचषकाबाबत बोलताना व्यंकटेश म्हणाला की, जेव्हा मला भारतीय क्रिकेट संघात बोलावण्यात आले तेव्हा मला वाटले की मी विश्वचषक खेळू शकेन पण मी तिथे नव्हते. यामुळे मला खूप वाईट वाटले. एकूणच विश्वचषकाच्या संघात न खेळता आल्यामुळे अय्यरने नाराजी व्यक्त केली आहे.

"मला माझ्यापासून खरोखर दूर असलेल्या एखाद्या गोष्टीबद्दल विचार करण्याच्या स्थितीत ठेवायचे नाही. ज्या गोष्टी घडणार आहेत त्या गोष्टी घडतीलच. माझ्या हातात फक्त एकच गोष्ट आहे की प्रक्रियेसोबत राहणे, दररोज चांगले होत राहणे", असे अय्यरने अधिक म्हटले.

भारतीय संघ 25 नोव्हेंबरपासून न्यूझीलंडसोबत एकदिवसीय मालिका खेळणार आहे. दुखापतीमुळे व्यंकटेश अय्यर या देखील मालिकेला मुकला आहे. शिखर धवनच्या नेतृत्वात भारतीय संघ न्यूझीलंडच्या धरतीवर 3 एकदिवसीय सामने खेळणार आहे.

न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेसाठी एकदिवसीय संघ - शिखर धवन (कर्णधार), ऋषभ पंत, शुबमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.