अमेरिकेने पहिल्या सामन्यात कॅनडाचा पराभव करून विजयी सलामी दिली. आपला कट्टर प्रतिस्पर्धी कॅनडाला पराभवाची धूळ चारून यजमान अमेरिकेने विजयी सलामी दिली. ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ च्या सलामीच्या सामन्यात अमेरिकेने मोठा विजय मिळवला.
कॅनडाने दिलेल्या १९५ धावांच्या तगड्या लक्ष्याचा सहज पाठलाग करत यजमानांनी घरच्या चाहत्यांना खुशखबर दिली. अँड्रिस गूस आणि आरोन जोन्स या जोडीने षटकारांचा पाऊस पाडून कॅनडाच्या गोलंदाजांना घाम फोडला.
आरोन जोन्सने ४० चेंडूत १० षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने नाबाद ९४ धावा केल्या आणि अमेरिकेने ७ गडी आणि १४ चेंडू राखून विजय साकारला.
यजमानांनी १७.४ षटकांत १९७ धावा करून सहज लक्ष्य गाठले. विशेष बाब म्हणजे अमेरिकेने या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करून इतिहास रचला.
अमेरिकेचा कर्णधार मोनांक पटेल (१६) स्वस्तात माघारी परतला. मग अँड्रिस गूस आणि आरोन जोन्स यांनी मोर्चा सांभाळला. त्यांनी तब्बल १३१ धावांची भागीदारी नोंदवून विजयाकडे कूच केली.
अँड्रिस गूस ४६ चेंडूत ३ षटकार आणि ७ चौकार ठोकून ६५ धावांवर बाद झाला. कॅनडाकडून कलीम साना, डिलन हेलिगर आणि निखिल दत्ता यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.
विश्वचषकाच्या एका डावात ८ किंवा त्यापेक्षा जास्त षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आरोन जोन्सने स्थान मिळवले. स्फोटक खेळीमुळे जोन्सला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
या आधी ख्रिस गेलने २०१६ मध्ये एका डावात ११ षटकार मारले होते. यंदा अमेरिकेच्या आरोन जोन्सने कॅनडाविरूद्धच्या सामन्यात १० षटकार ठोकण्याची किमया साधली.
मोनंक पटेल (कर्णधार), स्टीव्हन टेलर, अँड्रिस गूस, आरोन जोन्स, नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, शादले वॅन शल्कविक, जसदीप सिंग, सौरभ नेत्रावलकर, अली खान.