गिलसाठी २०२३ 'शुभ' वर्ष! भारतीय खेळाडूचा केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते नामांकित पुरस्काराने सन्मान

IBLA 2023 19th Edition : शुबमन गिलसाठी २०२३ हे वर्ष खूप खास राहिले.

भारतीय संघाचा स्टार खेळाडू शुबमन गिलसाठी २०२३ हे वर्ष खूप खास राहिले. या वर्षात गिलने अप्रतिम कामगिरी केली. आयपीएल, द्विपक्षीय मालिका, आशिया चषक आणि वन डे विश्वचषकाच्या माध्यमातून त्याने धावांचा पाऊस पाडला.

आयपीएलच्या आगामी हंगामाच्या तोंडावर त्याच्या खांद्यावर गुजरात टायटन्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अशातच गिलचा 'स्पोर्ट्स लीडर ऑफ द इयर' या पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी ट्रॉफी देऊन भारतीय खेळाडूला सन्मानित केले. त्याला हा पुरस्कार इंडियन बिझनेस लीडर अवॉर्ड्स समारंभारत देण्यात आला.

यंदाच्या वर्षात शुबमन गिलने उत्कृष्ट फलंदाजी केली. आयपीएल २०२३ च्या हंगामात तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. यासह त्याने पहिल्यांदाच ऑरेंज कॅप पटकावली.

दरम्यान, २०२३ या वर्षात क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून गिलची नोंद झाली आहे.

त्याने चालू वर्षात एकूण ४५ आंतरराष्ट्रीय सामने खेळले, ज्यामध्ये ५०.४२च्या सरासरीनुसार २,११८ धावा करण्यात त्याला यश आले.

वन डे मध्ये द्विशतक झळकावण्याची किमया देखील गिलने या वर्षात साधली. न्यूझीलंडविरूद्ध १४९ चेंडूत २०८ धावा करून गिल वन डे मध्ये द्विशतक झळकावणारा चौथा भारतीय ठरला.

याआधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (१), वीरेंद्र सेहवाग (१), रोहित शर्मा (३) आणि इशान किशन (१) यांना दुहेरी शतक झळकावता आले आहे.

२०२३ च्या वन डे विश्वचषकात भारताने सलग दहा विजय मिळवले पण किताबाच्या लढतीत यजमानांना अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला. या स्पर्धेच्या सुरूवातीला शुबमन गिल आजारी असल्यामुळे काही सामन्यांना मुकला पण जबरदस्त पुनरागमन करून त्याने संघाच्या विजयात हातभार लावला.