दारुण पराभवानंतर हे खेळाडू प्लेइंग-११ मधून होऊ शकतात बाहेर, तिसऱ्या वनडेसाठी टीम इंडियाचा काय असेल प्लॅन?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना बुधवार २२ मार्च रोजी चेन्नई येथे खेळवला जाणार आहे.

Ind vs Aus 3rd ODI: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना बुधवार २२ मार्च रोजी चेन्नई येथे खेळवला जाणार आहे. भारतीय संघानं पहिल्या सामन्यात पाच गडी राखून नेत्रदीपक विजय मिळवला होता.

मात्र दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला १० गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. अशा स्थितीत आता तिसरा सामना दोन्ही संघांसाठी निर्णायक ठरणार असून विजयी संघ वनडे मालिकेवर कब्जा करेल. भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता हा सामना खेळवला जाईल.

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातही चाहत्यांच्या नजरा भारतीय संघाच्या कॉम्बिनेशनवर असणार आहेत. पहिल्या दोन सामन्यांमध्ये डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कसमोर टीम इंडियाची अव्वल फळी ज्या पद्धतीने कोलमडली, तो चिंतेचा विषय आहे.

सूर्यकुमार यादवची कामगिरी खूपच लाजिरवाणी होती आणि दोन्ही सामन्यात पहिल्याच चेंडूवर तो मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर एलबीडब्ल्यू आऊट झाला. अशा स्थितीत सूर्यकुमारला तिसऱ्या वनडेत संधी मिळेल की नाही हे पाहावं लागेल. दरम्यान, रोहित शर्माने सूर्यकुमारला पुन्हा संधी देण्याचे संकेत दिले होते.

'श्रेयस अय्यरच्या पुनरागमनाबद्दल कल्पना नाही. श्रेयसची जागा रिक्त आहे, त्यामुळे आम्ही सूर्यालाच मैदानात उतरवू. ज्यांच्याकडे क्षमता आहे त्यांना संधी मिळेल, असं मी अनेकदा सांगितलं आहे. सूर्याला माहित आहे की त्याला वनडेतही चांगली कामगिरी करावी लागणार आहे. सक्षम खेळाडूंना पुरेशा संधी दिल्या गेल्या नाहीत असं कधीच वाटू नये. गेल्या दोन सामन्यांमध्ये तो लवकर बाद झाला पण त्याला सलग सात आठ किंवा दहा सामने खेळून द्यावे लागतील, असं रोहित म्हणाला होता.

चेपॉक येथील खेळपट्टी साधारणपणे धीमी असते. सामन्याच्या दिवशीही पावसाचा अंदाज आहे, म्हणजे डावाच्या सुरुवातीला वेगवान गोलंदाजांची भूमिका महत्त्वाची ठरेल.

यापूर्वी वेळी भारत येथे खेळला तेव्हा खेळपट्टीने वेगवान गोलंदाजांना मदत केली. त्या सामन्यात वेस्ट इंडिज संघानं २८८ धावांचं लक्ष्य केवळ दोन गडी गमावून पूर्ण केलं होतं. यावेळीही गोलंदाजी करणाऱ्या खेळपट्टीमुळे भारतीय फलंदाजांना पहिल्या १० षटकांमध्ये विशेषत: मिचेल स्टार्कविरुद्ध अत्यंत सावधपणं खेळावं लागणार आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत आक्रमक रणनीती अवलंबत भारतीय संघ तीन विशेष वेगवान गोलंदाजांसह उतरवू शकतो. अशा स्थितीत शार्दुल ठाकूर किंवा उमरान मलिक यांना खेळण्याची संधी मिळू शकते. उमरान मलिकला खेळण्याची अधिक संधी मिळत आहे कारण त्याच्याकडे अतिरिक्त वेग आहे जो या खेळपट्टीवर प्रभावी ठरू शकतो.

उमरान किंवा शार्दुल ठाकूर खेळल्यास अक्षर पटेलला बाहेर राहावं लागू शकतं. यासोबतच भारतीय संघ व्यवस्थापन गोलंदाज कुलदीप यादवच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला प्लेइंग-११ मध्ये सामील करू शकते. सुंदर गोलंदाजीसह फलंदाजीतही उपयुक्त ठरू शकतो. बॅटिंग लाइनअपमध्ये बदल होण्याची शक्यता नाही.