मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा क्रिकेटसोबत गोल्फच्या मैदानातही दिसत असतो. तसेच गोल्फच्या ग्राऊंडमधून तो फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो. त्याने नुकताच सोशल मीडियावर गोल्फ खेळतानाचे काही फोटो शेअर केले आहेत. ते फोटो पाहून फॅन्सनी त्याची तुलना बजरंगबलीशी केली आहे.
सचिन तेंडुलकरने १० ऑक्टोबर रोजी वेगवेगळे तीन फोटो शेअर केले आहेत. त्या फोटोंमध्ये सचिन तीन वेगवेगळ्या मूडमध्ये दिसत आहे. तसेच तो सूर्याला गिळण्याच्या स्टाईलमध्ये फोटो काढताना दिसत आहे.
सचिनने शेअर केलेले हे फोटो पाहून फॅन बजरंगबली हनुमानाची आठवण काढत आहेत. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करताना सचिन तेंडुलकरने लिहिले की, पाश्चात्य देशांनो जर आज तुमच्याकडे सूर्य उगवला नाही तर मला माफ करा.
सचिनने हल्लीच रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज स्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धेत सचिनने आपल्या नेतृत्वाखाली इंडिया लिजेंड्स संघाला सलग दुसऱ्यांचा विजेता बनवले होते.
सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नऊ वर्षांपूर्वी निवृत्ती स्वीकारली होती. कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा आणि शतकांचा विक्रम त्याच्या नावावर आहे.
सचिन भारतीय संघाकडून एकूण ६६४ सामने खेळला आहे. त्या सामन्यात त्याने ४८.५२ च्या जबरदस्त सरासरीने ३४ हजार ३५७ धावा कुटल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिनच्या नावावर १०० शतके आणि १६४ अर्धशतके आहेत.