भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा कसोटी सामना हैदराबाद येथील उप्पल मधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू आहे. या स्टेडियमच्या आत शिरताच तुम्हाला एक मंदिर दिसेल आणि या मंदिरामुळे भारतीय संघाचे नशीब फळफळल्याचा दावा करण्यात येत आहे.
एरवी या मंदिराकडे कोणाचेही लक्ष जात नाही, परंतु सामन्याच्या वेळेला हे मंदिर सर्वांचे लक्ष वेधून घेते. या मंदिरामागची कथा रंजक आहे. मंदिरातील पुजारी हनुमंत शर्मा सांगतात की,'' भारतीय संघ आणि तत्कालीन आयपीएल फ्रँचाईजी डेक्कन चार्जर्स या स्टेडियमवर सामने जिंकत नव्हते तेव्हा 2011 मध्ये हे मंदिर उभारण्यात आले.''
ते पुढे म्हणाले,''स्थानिक संघासाठी हे मैदान अशुभ मानले जाऊ लागले होते. तेव्हा या वास्तुत दोष असल्याचे समोर आले. त्यानंतर येथे गणपतीचे मंदिर उभारण्यात आले आणि 2011 नंतर भारतीय संघाचा येथील विक्रम पाहा. भारत येथे एकही सामना हरलेला नाही.''
आकडेवारीनुसार भारताने या मैदानावर 2005 मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या त्या लढतीत भारताला पाच विकेटने पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर 2007 व 2009 मध्येही भारत ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाला.
भारताने 14 ऑक्टोबर 2011 मध्ये येथे इंग्लंडला नमवले होते आणि श्रीलंकेलाही भारताने नमवले होते. त्यानंतर तीन कसोटी सामन्यांत भारताने मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी स्टेडियमवर सराव सत्रा दरम्यान मंदिरात आशीर्वाद घेतो. कर्ण शर्माही येथे अनेकदा आला आहे, असे हनुमंत यांनी सांगितले.