पाकिस्तान अन् नेपाळ असे भारताचे दोन्ही सामने रद्द होणार; मग सुपर ४ मध्ये कसे पोहोचणार?

Team India super 4 scenario Asia Cup 2023 : पाकिस्तानने पहिल्या सामन्यात विजय मिळवून आशिया चषक २०२३ स्पर्धेत दणक्यात सुरूवात केली आहे. त्यामुळे त्यांनी सुपर ४ च्या दिशेने मोठी झेप घेतलीय, पण भारतासाठी हा प्रवास सोपा नक्की नाही, कारण त्यांच्या मार्गात पाकिस्तान व नेपाळ यांच्याशिवाय आणखी एक शत्रू आहे.

नेपाळवरील २३८ धावांच्या विजयाने पाकिस्तानचे मनोबल उंचावले आहे. बाबर आजम अँड टीमशी भारतीय संघाला आशिया चषकातील पहिला सामना शनिवारी खेळायचा आहे. पण, त्या सामन्याआधीच भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी समोर येतेय.

टीम इंडिया आशिया कपच्या नव्या मोसमासाठी सज्ज झाली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघ श्रीलंकेत पोहोचला आहे. भारतीय संघाला २ सप्टेंबरला पहिला सामना पाकिस्तानशी आणि ४ सप्टेंबर रोजी गट फेरीतील शेवटच्या सामन्यात नेपाळशी सामना करायचा आहे. दोन्ही सामन्यांमध्ये पावसाची ९० टक्के शक्यता आहे.

स्पर्धेतील गट फेरीच्या सामन्यांसाठी कोणताही राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. म्हणजेच, सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. नेपाळविरुद्धचा पहिला सामना मोठ्या फरकाने जिंकून पाकिस्तान संघ सुपर-४ साठी जवळपास पात्र ठरला आहे. भारत आणि पाकिस्तान सामना रद्द झाला, तर बाबर आजमचा संघ सुपर-४ साठी पात्र ठरेल.

पाकिस्तानचे २ सामन्यांनंतर तीन गुण होतील. नेपाळविरुद्धचा सामनाही पावसामुळे रद्द झाल्यास भारतीय संघाला ३ गुणांचा टप्पा गाठता येणार आहे. भारताला २ गुणांवर समाधानी रहावे लागेल, तर नेपाळच्या खात्यात १ गुण असेल. अशात भारत सुपर ४ मध्ये जाईल. पण, जर भारतीय संघ पहिल्या लढतीत पाकिस्तानकडून हरला अन् नेपाळविरुद्धचा सामना पावसामुळे नाही झाला, तर नेट रन रेट महत्त्वाचा ठरेल.

ब गटाबद्दल बोलायचे झाले तर येथे चुरशीची स्पर्धा होणार आहे. श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान असे तगडे संघ गटात आहेत. अफगाणिस्तानने नेहमीच आपल्या कामगिरीने मोठ्या संघांना चकित केले आहे. दोन्ही गटातील टॉप-२ संघ सुपर-४ मध्ये जातील. सुपर-४ मध्ये सर्व संघांना ३-३ सामने खेळायचे आहेत. यानंतर टॉप-२ संघ अंतिम फेरीत जातील. टीम इंडियाने सर्वाधिक ७ वेळा आशिया कप जिंकला आहे. श्रीलंकेने ६ वेळा आणि पाकिस्तानने २ वेळा ही स्पर्धा जिंकली आहे.