Ind Vs SA : 'पहिल्या डावात झाली मोठी चूक'; केएल राहुलनं सांगितलं पराभवाचं कारण...

Ind Vs SA Second Test KL Rahul: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या जोहान्सबर्ग येथील कसोटी सामन्यात भारतीय संघाला ७ विकेट्सनं पराभव पत्करावा लागला होता.

Ind Vs SA Second Test KL Rahul: भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवसाचा बराचसा खेळ पावसामुळे वाया गेला. साडेपाच तासानंतर चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाला. परंतु आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर याच्या पक्क्या निर्धारासमोर सारे हरले.

एल्गरनं सहकाऱ्यांना सोबत घेत आफ्रिकेला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. आफ्रिकेनं ७ विकेट्स राखून हा सामना जिंकताना मालिकेत १-१ अशी बरोबरी मिळवली. जोहान्सबर्गवर अपराजित राहिलेला भारतीय संघ येथे प्रथमच हरला. विराट कोहलीच्या आक्रमकतेची उणीव या सामन्यात प्रकर्षानं जाणवली.

दरम्यान, २४० धावांचं टार्गेट देऊनही भारताला या सामन्यात विजय मिळवता आला नाहीय यावर सामन्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार लोकेश राहुल यानं मोठी गोष्ट सांगितली. पहिल्या डावात चूक झाली होती, ज्याचा परिणाम भोगावा लागला असं राहुल म्हणाला.

आम्ही सामना जिंकण्याच्याच निश्चयानं मैदानात उतरलो होतो आणि आम्हाला सामना जिंकायचाच होता. याच विचारामुळे आज आम्ही मोठ्या टीमच्या रुपात या ठिकाणी आहोत.

आम्ही मैदानात जिंकण्याच्या निश्चायानं उतरलो होतो आणि कठोर मेहनत केली होती. यामुळेच आम्ही थोडे निराश झालो. परंतु या मॅचचं संपूर्ण श्रेय दक्षिण आफ्रिकेला द्यायला हवं. ते उत्तम क्रिकेट खेळले. त्यांनी चांगली गोलंदाजी आणि फलंदाजीही केली, असंही तो म्हणाला.

आम्ही मैदानावर उतरण्यासाठी उत्सुक होतो. चौथ्या दिवशी १२२ धावा करणं कठीण काम नव्हतं. परंतु आम्हाला यासाठी काहीतरी विशेष करायचं होतं. पण आम्ही यात यशस्वी झालो नाही, असंही त्यानं स्पष्ट केलं.

पिच सातत्यानं अप-डाऊन होत होतं. परंतु मी एकच सांगू इच्छितो की दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी उत्तम फलंदाजी केली आणि आपलं काम पूर्ण केलं. जर पहिल्या डावात आम्ही ६०-७० धावा अधिक केल्या असत्या तर सामन्याचा निर्णय आज काही वेगळा असता, असंही राहुलनं सांगितलं.

केएल राहुलनं बोलतान शार्दुल ठाकूरचंही (Shardul Thakur) कौतुक केलं. शार्दुलनं आपली चांगली कामगिरी दाखवली आहे. पुढील सामन्यांमध्येही त्याची उत्तम कामगिरी कायम राहिल अशी अपेक्षा आहे, असं तो म्हणाला.

याशिवाय त्यानं चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणेचंही (Ajinkya Rahane) कौतुक केलं. हे दोन्ही आमच्यासाठी मोठे खेळाडू आहेत. गेल्या काही वर्षांपासून त्यांचं टीमसाठी चांगलं योगदान आहे. टीम पूर्णपणे त्यांच्यावर विश्वास करते आणि ते मीडल ऑर्डरचे चांगले फलंदाज आहेत, असं त्यानं स्पष्ट केलं.

यावेळी त्यानं विराट कोहलीबाबतही (Virat Kohli) वक्तव्य केलं. काही दिवसांपासून तो नेट प्रॅक्टिस करत आहे. फिल्डिंग आणि रनिंगही करत आहे. आता तो पूर्णपणे फिट आहे असं मला वाटतं, असंही त्यानं सांगितलं.

पाठदुखीमुळे कोहलीनं दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर राहण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या जागी केएल राहुल याच्याकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली होती. तिसऱ्या कसोटी सामन्यात कोहली पुनरागमन करेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

भारताच्या पहिल्या डावातील २०२ धावांच्या प्रत्युत्तरात आफ्रिकेचा पहिला डाव २२९ धावांवर गडगडला. शार्दूल ठाकूरनं ६१ धावांत ७ विकेट्स घेतल्या. भारताच्या दुसऱ्या डावात चेतेश्वर पुजारानं ८६ चेंडूंत ५३ आणि अजिंक्य रहाणेनं ७८ चेंडूंत ५८ धावांची खेळी केली. आर अश्विन व शार्दूल ठाकूर यांनी फलंदाजीत योगदान देताना अनुक्रमे १६ व २८ धावा केल्या. हनुमा विहारी एका बाजूनं विकेट टिकवून खेळला, परंतु भारताचा दुसरा डाव २६६ धावांवर आटोपला. चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेच्या संघानं भारताचा पराभव केला.