टी-२० विश्वचषकातील पहिल्या फेरीचे सामने सुरू झाले आहेत. दरम्यान, भारतीय संघ आपला पहिला सामना २४ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे.२००७ साली पहिल्या विश्वचषकात विजय मिळवल्यानंतर गेल्या १४ वर्षांत भारताला ही स्पर्धा जिंकता आलेली नाही. आज नजर टाकूया या स्पर्धेतील काही खास रेकॉर्ड्सवर.
टी-२० विश्वचषकात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेल याच्या नावे आहे. ख्रिस गेलने या स्पर्धेत २८ सामने खेळताना ६० षटकार ठोकले. दुसऱ्या क्रमांकावर भारताचा सिक्सर किंग युवराज सिंग आहे. त्याने टी-२० विश्वचषकात एकूण ३३ षटकार ठोकले आहेत.
टी-२० विश्वचषकात सर्वाधिक धावा फटकावण्याचा विक्रम श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेच्या नावावर आहे. त्याने ३१ सामन्यात १०१६ धावा काढल्या आहेत. तर वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल ९२० धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
टी-२० विश्वचषकामध्ये सर्वाधिक बळी टिपण्याचा विक्रम हा पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीच्या नावे आहे. आफ्रिदीने ३४ सामन्यात ३९ बळी टिपले आहेत. तर श्रीलंकेच्या लासिथ मलिंगाने ३१ सामन्यात ३८ बळी टिपले आहेत.
टी-२० विश्वचषकामध्ये सर्वाधिक सामन्यांमध्ये संघाचं नेतृत्व करण्याचा विक्रम भारताच्या महेंद्रसिंह धोनीच्या नावावर आहे. धोनीने २००७ ते २०१६ या काळात धोनीने ३३ सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर वेस्ट इंडिजच्या डरेन सॅमी आहे. सॅमीने १८ सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजचे नेतृत्व केले होते.