India vs Pakistan, T20 World Cup 2022 : भारताने २३ ऑक्टोबर हा दिवस ऐतिहासिक बनवला... कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत थरारक विजयाची नोंद केली. विराट कोहली व हार्दिक पांड्या हे या विजयाचे नायक ठरले.
विराटच्या नाबाद ८२ धावा अन् हार्दिकची ( ३ विकेट्स व ४० धावा) अष्टपैलू कामगिरी निर्णायक ठरली. हा सामना भारतीय चाहत्यांसाठी संस्मरणीय ठरला आणि ऐन दिवाळीच्या पूर्वसंध्येला भारतीयांनी फटाक्यांची आतषबाजी केली. पण, या सामन्यात एक असा प्रसंग घडला की ज्याचा भारतीय चाहत्याला ६ लाखांचा फटका बसला असला. रोहित शर्मा अँड टीमने त्या चाहत्याला आर्थिक संकटापासून वाचवले.
भारत-पाकिस्तान यांच्यात मेलबर्नवर सुपर संडेला थरार पाहायला मिळाला... भारतीय संघाची झालेली पडझड पाहून आता काही खरं नाही असेच वाटले. अखेरच्या १० षटकांत ११५ धावा करायच्या होत्या आणि शाहिन आफ्रिदी, हॅरिस रौफ, नसीम शाह हा जलजगती मारा करणारा तोफगोळा समोर होता. पण, विराट व हार्दिक जोडीनं चतुराईने भारताला विजय मिळवून दिला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ११३ धावा जोडल्या आणि पाकिस्तानच्या तोंडचा घास पळवला. भारताने ४ विकेट्स राखून हा सामना जिंकला.
शान मसूद ( ५२*) व इफ्तिखार अहमद ( ५१) यांच्या खेळीने पाकिस्तानने ८ बाद १५९ धावा केल्या. अर्शदीप सिंग ( ३-३२) व हार्दिक पांड्या ( ३-३०) यांनी पाकिस्तानला धक्के दिले. हार्दिकने एका षटकात दोन विकेट्स घेत खऱ्या अर्थाने सामन्याला कलाटणी दिली. प्रत्युत्तरात लोकेश राहुल, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव व अक्षर पटेल हे ३१ धावांवर माघारी परतले. हार्दिक ( ४०) व विराट कोहली ( ८२*) यांनी शतकी भागीदारी करून डाव सावरला अन् भारताचा विजय पक्का केला.
पाकिस्तानची फलंदाजी सुरू असताना एक चाहता सुरक्षा रक्षकांना चकवून मैदानावर शिरला अन् त्याने भुवनेश्वर कुमारकडे ऑटोग्राफ मागण्याचा प्रयत्न केला.
सुरक्षा कर्मचारी लगेच मैदानावर पोहोचले आणि त्यांनी त्याला अटक करून मैदानाबाहेर नेले. आयसीसीच्या नियमानुसार प्रेक्षकाकडून अशी चूक झाल्यास त्याला ६ लाख रुपयांचा दंड भरावा लागतो.
भारतीय संघाने या चाहत्याविरोधात कोणतीच तक्रार न नोंदवण्याचा निर्णय घेतला आणि ६ लाख दंड भरण्यापासून तो वाचला.