श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer ) - इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत खांद्याला दुखापत झाली आणि दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजाला शस्त्रक्रीया करून घ्यावी लागली. त्यामुळे तो आयपीएल २०२१च्या पहिल्या टप्प्यात खेळला नाही. वर्ल्ड कप संघात त्याचा राखीव खेळाडू म्हणून समावेश केला गेला आहे. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात त्यानं दमदार कमबॅक केले. त्यानं सलग दोन सामन्यांत ४०+ धावा करताना दिल्लीच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. मुंबई इंडियन्सविरुद्ध आव्हानात्मक खेळपट्टीवर त्यानं ३३ धावा केल्या. त्याच सामन्यात मुंबईनं इशान किशनला बाकावर बसवले, त्यानं तीन सामन्यांत ११, १४ व ९ अशी कामगिरी केली होती.
युझवेंद्र चहल ( Yuzvendra Chahal) - युझवेंद्र चहलला वर्ल्ड कप संघातून वगळणे हा धक्कादायक निर्णय नक्कीच म्हणावा लागेल. तो आऊट ऑफ फॉर्म होता हे खरंय, म्हणून काय २०१७साली अखेरची ट्वेंटी-२० मॅच खेळणाऱ्या आर अश्विनची निवड होणे, काहीसे खटकणारे आहे. युझवेंद्रनं त्याच्या कामगिरीतून निवड समितीला उत्तर द्यायचे ठरवले आहे आणि तो सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. त्यानं आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात पाच सामन्यांत १० विकेट्स घेतल्या आहेत. राहुल चहरनं त्याच्या जागी संघात स्थान पटकावले. मुंबई इंडियन्सनं त्यालाही बाकावर बसवले आहे.
आवेश खान ( Avesh Khan) - आयपीएल २०२१मध्ये सध्याचा फॉर्म पाहता आवेश खानचा विचार करायला हरकत नव्हती, असे निवड समितीला आता नक्कीच वाटत असेल. इंग्लंड दौऱ्यावर त्याची राखीव खेळाडू म्हणून निवड झाली होती, परंतु सराव सामन्यात दुखापत झाली अन् तो मायदेशी परतला. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा हा गोलंदाज आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करत आहे. त्यानं ७ विकेट्स तर घेतल्याच शिवाय प्रतिस्पर्धींच्या धावांना चापही लगावला आहे. त्याचा नावाचा निवड समितीनं विचार केला होता, परंतु शमी-बुमराह-भुवनेश्वर या अनुभवी गोलंदाजांना त्यांनी प्राधान्य दिले.
हर्षल पटेल ( Harshal Patel) - ट्वेंटी-२० स्पेशालिस्ट हर्षल पटेल हा वर्ल्ड कप संघात हवा होता, असे आता अनेकांना वाटत असेल. RCBच्या या गोलंदाजानं १२ सामन्यांत २६ विकेट्स घेत नुसता धुरळा केला आहे. RCBकडून एका पर्वात सर्वाधिक विकेट्स घेणारा तो गोलंदाज बनला. पण, त्याच्यापुढे दीपक चहर, शार्दूल ठाकूर हे तगडे पर्याय होते.
ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad ) - चेन्नई सुपर किंग्सचा हा सलामीवीर भारीच फॉर्मात आहे. आयपीएल २०२१त ५०० धावा करण्याचा पहिला मान त्यानं पटकावला आणि त्याची सातत्यपूर्ण कामगिरी निवड समितीचे लक्ष वेधणारी आहे.