T20 World Cup, NAM vs UAE : यूएईने टीम इंडियाला संकटातून वाचवले, विश्वविजेत्या संघाला दुसऱ्या गटात पाठवले; पाहा सुधारित वेळापत्रक

T20 World Cup, NAMIBIA V UNITED ARAB EMIRATES Live : आशिया चषक २०२२ विजेत्या श्रीलंकेला नमवून ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये दणक्यात सुरुवात करणाऱ्या नामिबियाची गाडी रूळावरून घसरली. ग्रुप अ मधील नंतरच्या दोन सामन्यांत नामिबियाला हार मानावी लागली.

T20 World Cup, NAMIBIA V UNITED ARAB EMIRATES Live : आशिया चषक २०२२ विजेत्या श्रीलंकेला नमवून ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये दणक्यात सुरुवात करणाऱ्या नामिबियाची गाडी रूळावरून घसरली. ग्रुप अ मधील नंतरच्या दोन सामन्यांत नामिबियाला हार मानावी लागली आणि त्यामुळे सुपर १२मधील त्यांना प्रवेश करता आला नाही. यूएईविरुद्धच्या आजच्या निर्णायक सामन्यात डेव्हिड विसेने अफलातून खेळ करताना अखेरपर्यंत रंगत ठेवली होती, परंतु नामिबियाला थोडक्यात पराभव मानावा लागला.

प्रथम फलंदाजी करताना यूएईने ३ बाद १४८ धावा केल्या. सलामीवीर मुहम्मद वसीमने ४१ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारांसह ५० धावा केल्या. वृत्या अरविंदने २१ धावा केल्या. कर्णधार चुंदांगापोयील रिझवानने २९ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारांसह नाबाद ४३ धावा चोपल्या. बसील हमिदने १४ चेंडूंत नाबाद २५ धावांचे योगदान दिले. यूएईच्या गोलंदाजांनी कमाल करताना नामिबियाला धक्क्यांमागून धक्के दिले.

बसिल हमिद, झहूर खान, जुनैद सिद्धीकी व कार्तिक मैयप्पन यांनी विकेट्स घेतल्या. कर्णधार गेऱ्हार्ड इरास्मस ( १६), जॅक फ्रायलिंक ( १४), मिचेल व्हॅन लिगेन ( १०) यांना अपयश आले. अनुभवी डेव्हिड विसे व रुबेन ट्रम्पल्मन यांनी संघर्ष सुरू ठेवला होता. ३३ धावांवर विसेला जीवदान मिळाले.

झेल सोडलाच शिवाय रन आऊटची संधीही सुटली आणि नामिबियाला १८ चेंडूंत ३६ धावा करायच्या होत्या. विसेने ३१ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह अर्धशतक झळकावताना नामिबियाच्या विजयाच्या आशा कायम राखल्या. त्यांना १२ चेंडूत २० धावा करायच्या होत्या. विसे व ट्रम्पल्मन यांनी ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या इतिहासात आठव्या विकेटसाठी सर्वोत्तम भागीदारीचा विक्रम नावावर केला.

यूएईला षटकांची मर्यादा संथ राखल्याचा फटका बसला आणि त्यांना ३० यार्ड बाहेर एक क्षेत्ररक्षक कमी उभा करावा लागला. नामिबियाला अखेरच्या षटकात १४ धावा करायच्या होत्या आणि विसे स्ट्राईकवर होता. २०व्या षटकात पहिल्या तीन चेंडूंवर ४ धावा आल्या आणि आता ३ चेंडूंत १० धावा करायच्या होत्या. तेव्हाच विसेची विकेट पडली. विसे ३६ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ५५ धावांवर बाद झाला. सीमारेषेवर शराफूने अफलातून कॅच घेतला. नामिबियाला ८ बाद १४१ धावा करता आल्या आणि यूएईने ७ धावांनी सामना जिंकला.

आज संयुक्त अरब अमिरातीने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद करताना नेदरलँड्ससह टीम इंडियाला मदत केली. यूएईच्या या विजयामुळे अ गटात माजी विश्वविजेता श्रीलंका अव्वल स्थानावर, तर नेदरलँड्स दुसऱ्या स्थानावर राहिले आणि सुपर १२मध्ये प्रवेश निश्चित झाला. आयसीसीच्या वेळापत्रकानुसार अ गटातील अव्वल संघ ग्रुप १ मध्ये खेळणार आहे, तर दुसऱ्या क्रमांकावरील संघ ग्रुप २ मध्ये खेळेल.

नामिबियाने हा सामना जिंकला असता तर ते अ गटात अव्वल स्थानी गेले असते आणि श्रीलंका दुसऱ्या क्रमांकावर आली असती. म्हणजेच भारताला सुपर १२मध्ये श्रीलंकेचा सामना करावा लागला असता आणि आशिया चषकातील निकाल पाहता भारतासमोर हे मोठे आव्हान ठरले असते.

म्हणजे माजी विजेता श्रीलंका आता अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व इंग्लंड यांच्या ग्रुप १ मध्ये खेळेल आणि नेदरलँड्स ग्रुप २ मध्ये भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका व बांगलादेश यांच्याविरुद्ध खेळेल. भारत- नेदरलँड्स यांच्यात २७ ऑक्टोबरला सामना होईल.